कारवार जिल्हा पोलिसांची कारवाई : रोख रकमेसह फसवणुकीसाठी वापरण्यात येणारे साहित्य जप्त
प्रतिनिधी / कारवार
विदेशात नोकरी देण्याचे सोशल मीडियाद्वारे खोटे आश्वासन देऊन रक्कम लाटणाऱया राज्यातील व परराज्यातील सायबर क्राईम ठकसेनांना कारवार जिल्हा पोलिसांनी ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेल्यांची बँक खाती गोठविली आहे. तसेच त्यांच्याकडील रक्कम व फसवणुकीसाठी वापरण्यात येणारे साहित्य जप्त करण्यात आले आहे.
ताब्यात घेतलेल्या व्यक्तींची नावे अशोक एम. एन. (कोलार), बुल्लीयगोर हालाम (आसाम), दर्तीन्वीर हणम (त्रिपुरा), पुरींगम पुंगशोक (मणिपूर) अशी आहेत.
होन्नावर तालुक्यातील गुणवंत येथील रहिवासी नेत्रा गौडा हिला अमेरिकेत नोकरी मिळवून देण्यासाठी ई-मेलद्वारे मेसेज पाठविला होता. त्यासाठी बँक खात्यावर पैसे पाठविण्यास सांगण्यात आले होते. ईमेलवर विश्वास ठेऊन गौडा यांनी कर्नाटक, त्रिपुरा, आसाम, तामिळनाडू, दिल्ली येथील बँक खात्यांवर एकूण 57 लाख 14 हजार 749 रुपये जमा केले. रक्कम जमा करूनही अमेरिकेत अपेक्षित नोकरी मिळविण्यात यश न आल्याने नेत्रा गौडा यांना आपली फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाले. पुढे त्यांनी जिल्हा सायबर क्राईम ठाण्यात 10 फेब्रुवारी रोजी तक्रार दाखल केली. सीईएन गुन्हे विभागाचे निरीक्षक सीताराम जी. व अन्य कर्मचाऱयांनी तपास केला असता कोलार, आसाम, त्रिपुरा व मणिपूर येथील ठकसेनांना ताब्यात घेण्यात आले.
याप्रकरणी ठकसेनाची सर्व बँक खाती गोठविली आहे. त्यांच्याकडून 24 हजार रुपये रोख रक्कम, स्वॅप मशीन, बायोमेट्रीक फिंगर प्रिंटर, थंब मशीन, 24 बँक पासबुक, 24 एटीएम कार्ड, 24 चेक बुक्स, 2 लॅपटॉप, 17 सीमकार्ड, 23 मोबाईल फोन, एक टॅब, दोन पेन ड्राईव्ह्स, एक डोंगल, एक वायफाय रोटर मशीन जप्त करण्यात आली आहे. ही कारवाई कारवार जिल्हा पोलीस प्रमुख शिवप्रसाद देवराजू, अतिरिक्त जिल्हा पोलीस प्रमुख एस. बदरीनाथ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.