गणेश गौरी पूजा-देवीला कंकण धारणोत्सवाचा कार्यक्रम होणार अत्यंत साधेपणाने
वार्ताहर / बाळेकुंद्री
कर्नाटक-महाराष्ट्र व गोव्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सौंदत्ती डोंगरावर सोमवार दि. 26 रोजी श्री गणेश, गौरीपूजा व रेणुकादेवीला कंकण मंगळसूत्र धारणोत्सवाचा कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर मंगळवार दि. 27 रोजी दवण्याची पौर्णिमा साजरी करण्यात येणार आहे.
कोरोनाच्या दुसऱया लाटेमुळे मंदिराचे अधिकारी, मठाचे स्वामी, तसेच पुजारींच्या उपस्थितीत वरील विधी साधेपणाने साजरे करण्यात येणार आहेत. दरम्यान, पुन्हा कोरोना रोगाच्या दुसऱया आलेल्या लाटेच्या भीतीने देवीचे दर्शन बंद ठेवण्यात आले आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या आदेशानुसार गेल्या मार्च महिन्यापासून भाविकांना देवीचे दर्शन बंद ठेवले आहे. सध्या भाविकांच्या आरोग्याच्या दृष्टीने मंदिर प्रशासनाने खबरदारी घेतली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून उगरगोळ गावच्या रस्त्यावरून यल्लम्मा डोंगरावरील जमदग्नी मंदिर संपर्क आणि जोगुळभावीचा रस्ता तसेच सौंदत्ती सूतगिरणीपासून डोंगरावर येणारा रस्ता पूर्णपणे बॅरिकेड्स व कांही ठिकाणी दगड घालून बंद करण्यात आला आहे. तेथे दीडशे पोलिसांचा कडेकोड बंदोबस्त ठेवण्यात आल्याची माहिती मंदिराचे वरिष्ठ अधिकारी रवी कोटारगस्ती यांनी दिली.
मुनवळी शिंदोगी, हुलीकट्टी रामदुर्ग, हिरेपुंबी हंचनाळ, आचमट्टी चिपुंबी, जोगळभावी सूतगिरणी या संपर्क रस्यावर बॅरिकेड्स उभारून रस्ते बंद करण्यात आले आहेत. तरी भाविकांनी डोंगरावर न येता घरातूनच देवीची आराधना करून देवीची विधिवत पूजा-अर्चा करावी, असे आवाहन त्यांनी केले आहे. दरम्यान, डोंगर परिसरात भाविकांअभावी शुकुशुकाट पसरला आहे. सोमवार व मंगळवारी हिरेमठ स्वामी तसेच मंदिराचे कार्यनिर्वाहक अधिकारी रवी कोटारगस्ती व पुजाऱयांच्या हस्ते पारंपरिक पद्धतीने देवीला अभिषेक, होम, विशेष पूजा व आरती आदी धार्मिक विधी पार पडणार आहेत.