ऑनलाईन टीम / रियाध :
सौदी अरेबियाच्या जेद्दाह शहरावर येमेनमधून मिसाईल हल्ला झाला आहे. या हल्ल्यात सौदी अरामको या तेल कंपनीच्या डेपोला भीषण आग लागली असून, लाखो लीटर तेल जळत आहे. येमेनमधील हुती बंडखोरांनी या हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे.
सरकारी सौदी प्रेसच्या माहितीनुसार, सौदी अरेबियातील जेद्दाह येथे रविवारी जगप्रसिद्ध फॉर्म्युला वन रेस होणार आहे. या रेसला काहीच तास बाकी असताना जेद्दाह शहरावर हुती बंडखोरांनी मिसाईल हल्ला केला. या हल्ल्यात सौदी अरामको या तेल कंपनीच्या डेपोला भीषण आग लागली आहे. लाखो लीटर तेल या ठिकाणी जळत आहे. त्यामुळे शहरावर धुराचा लोट पसरला आहे. फॉर्म्युला वन रेस सुरू होण्यापूर्वीच सौदी अरेबियाची नाचक्की व्हावी म्हणून हा मिसाईल हल्ला केला गेला आहे. हुती बंडखोरांना इराणचा पाठिंबा आहे. अशा कारवाया करुन उर्जा सुरक्षा आणि अर्थव्यवस्थेचा कणा कमकुवत करण्याचा त्यांचा हेतू असल्याचे सौदीने म्हटले आहे.