बालिका आदर्श शाळेत दहावीत शिकते तेजस्विनी : कलेची पार्श्वभूमी नसताना जोपासला छंद
प्रतिनिधी /बेळगाव
चित्रकलेचे कोणतेही प्रशिक्षण न घेता अभ्यासाबरोबरच केवळ एक आवड म्हणून जोपासलेली स्केचिंग ही कला बालिका आदर्श शाळेची विद्यार्थिनी तेजस्विनी पंकज लोहार हिची ओळख बनली आहे. कोणतीही व्यक्ती अथवा चित्राचे ती हुबेहुब स्केच काढत असल्यामुळे तिचे सर्वत्र कौतुक होत आहे. तिने काढलेल्या स्केचना अनेक मान्यवरांकडून उत्स्फूर्त दाद मिळाली आहे. घरात कलेची कोणतीही पार्श्वभूमी नसताना केवळ एक छंद म्हणून तेजस्विनी ही कला मनापासून जोपासत आहे.
तेजस्विनी सुतार ही चन्नम्मानगर बेळगाव येथील रहिवासी असून, बालिका आदर्श शाळेत दहावी इयत्तेत शिकत आहे. ती सहावीमध्ये असताना तरुण भारतच्या चॅम्पियन पुरवणीमधून माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे स्केच आले होते. त्यावेळी त्या स्केचप्रमाणे तेजस्विनीने स्केच काढले होते. तेथूनच तिच्या या कलेची खरी सुरुवात झाली. यानंतर तिने शाळेतील चित्रकला शिक्षक व पालकांच्या मदतीने स्केच काढण्यास सुरुवात केली आहे.
किरण ठाकुर यांनी केले होते कौतुक
शाळेमध्ये एका सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी तेजस्विनीच्या स्केचचे प्रदर्शन मांडण्यात आले होते. तरुण भारतचे समूहप्रमुख व सल्लागार संपादक किरण ठाकुर या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
यावेळी तेजस्विनीने किरण ठाकुर यांचे हुबेहुब स्केच काढले होते. तिने काढलेले हे स्केच पाहून किरण ठाकुर त्यावेळी अचंबित झाले होते. कोणतेही विशेष प्रशिक्षण न घेता इतक्मया सुंदर प्रकारे तिने काढलेले स्केच पाहून किरण ठाकुर यांनी तिच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली होती.
– तेजस्विनी लोहार
स्केच काढायची आवड आहे, यातूनच ही कला वाढत गेली आहे. आजवर अनेक क्रांतिकारक, देशभक्त, आसपासचे नातेवाईक, बेळगावमधील नेतेमंडळी यांची स्केच काढली आहेत. यामुळे दहावीनंतर यामध्ये व्यावसायिक प्रशिक्षण घेण्याची इच्छा तेजस्विनीने व्यक्त केली.
एन. ओ. डोणकरी (मुख्याध्यापक बालिका आदर्श शाळा)
तेजस्विनीने स्वतःमधील अंगभूत कलांच्या माध्यमातून स्केचची कला जोपासली आहे. बालिका आदर्शच्या कला शिक्षिका कविता चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली तिच्या कलेची जडणघडण होत आहे. तिने काढलेल्या हुबेहुब स्केचमुळे शाळेच्या नावलौकिकातही वाढ होत असल्याचे सांगून मुख्याध्यापक एन.ओ.डोणकरी यांनी तिचे कौतुक केले.