सातव्या शहराला मिळणार कनेक्टिव्हिटी
प्रतिनिधी /बेळगाव
संजय घोडावत ग्रुपच्या स्टार एअर या विमान कंपनीची बेळगाव-तिरूपती विमान सेवा आजपासून सुरू होणार आहे. यामुळे बेळगाव विमानतळावरून स्टार एअर आता सात शहरांना थेट विमान सेवा देणार आहे. या विमानसेवेमुळे बेळगावमधून तिरूपतीला जाण्यासाठी प्रवाशांना आणखी एक विमान उपलब्ध होणार आहे.
स्टार एअरला उडान 3 अंतर्गत बेळगाव तिरूपती हा मार्ग मंजूर झाला होता. परंतु कोरोनामुळे या मार्गावर विमानफेरी सुरू करण्यास विलंब होत होता. कोरोनाचा धोका कमी झाल्यानंतर स्टार एअरने या मार्गावर विमान फेरी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. आठवडय़ातून दोन दिवस ही सेवा मिळणार आहे. सोमवार व बुधवार अशी ही आठवडय़ातून दोन दिवस विमान फेरी असून, अवघ्या तासाभरामध्ये बेळगावमधून तिरूपतीला पोहोचता येणार आहे.