वृत्त संस्था/ स्टॉकहोम (स्वीडन)
एटीपी टूरवरील येथे झालेल्या स्टॉकहोम खुल्या पुरूषांच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत अमेरिकेच्या टॉमी पॉलने एकेरीचे अजिंक्यपद पटकाविताना विद्यमान विजेत्या कॅनडाच्या शेपोव्हॅलोव्हचा अंतिम सामन्यात पराभव केला.
शनिवारी झालेल्या या स्पर्धेतील पुरूष एकेरीच्या अंतिम सामन्यात टॉमी पॉलने शेपोव्हॅलोव्हचा 6-4, 2-6, 6-4 असा पराभव करत एटीपी टूरवर आपले पहिले विजेतेपद पटकाविले. हा अंतिम सामना दोन तास, 12 मिनिटे चालला होता. 24 वर्षीय टॉमी पॉलने 2021 टेनिस हंगामातील आपला 25 वा विजय नोंदविला आहे.
2006 नंतर स्टॉकहोम टेनिस स्पर्धा जिंकणारा टॉमी पॉल हा अमेरिकेचा पहिला टेनिसपटू आहे. 2006 साली अमेरिकेच्या जेम्स ब्लेकने ही स्पर्धा सलग दुसऱयांदा जिंकली होती. या स्पर्धेत अमेरिकेच्या टॉमी पॉलने लिओ बोर्ग, टेलर फ्रीज, अँडी मरे आणि टिफोई यांचा पराभव करत अंतिम फेरी गाठली होती.