बजेट वेबिनारमध्ये पंतप्रधान मोदींचे प्रतिपादन- भारतीय गुणवत्तेला जगभरातून मोठी मागणी
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
शिक्षण मंत्रालयाकडून बुधवारी आयोजित ‘बजेट वेबिनार’ला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संबोधित केले आहे. भारतीय गुणवत्तेला आज जगभरात मागणी आहे. भारताचे तरुण-तरुणी प्रत्येक क्षेत्रात उत्तम काम करत आहेत. भारतात प्रचंड गुणवत्ता असून केवळ स्थानिक भाषा जाणणाऱया तरुणाईला भारताच्या विकासयात्रेतून वगळले जाऊ नये, असे उद्गार मोदींनी काढले आहेत. गुणवत्तेला वाव मिळताना भाषिक अडथळे निर्माण होऊ नयेत यादृष्टीने भारतीय शिक्षणव्यवस्थेने काम करण्याच गरज असल्याचे मोदी म्हणाले.
आत्मनिर्भरतेसाठी तरुणाईला आत्मविश्वासाची गरज असते. आत्मविश्वास थेट स्वरुपात शिक्षण, कौशल्य विकास आणि संशोधनाशी संबंधित आहे. नव्या शिक्षण धोरणात या सर्व बाबींचा समावेश आहे. या धोरणामुळे देशातील युवा मजबूत होईल. देश स्वतःच्या वैयक्तिक, बौद्धिक, औद्योगिक स्वभाव आणि गुणवत्तेला दिशा देणाऱया पूर्ण व्यवस्थेत परिवर्तन करण्याच्या दिशेने वेगाने वाटचाल करत असताना हे मंथन होत असल्याचे मोदी म्हणाले.
मागील काही वर्षांमध्ये शिक्षणाला रोजगार आणि उद्योजकतेच्या क्षमतेशी जोडण्याचा प्रयत्न करण्यात आला असून हा अर्थसंकल्प त्या प्रयत्नांना अधिक विस्तार प्रदान करतो. याच प्रयत्नांमुळे वैज्ञानिक प्रकाशनाप्रकरणी भारत पहिल्या 3 देशांमध्ये पोहोचल्याचे उद्गार पंतप्रधानांनी काढले आहेत.
पहिल्यांदाच शाळांमध्ये अटर टिंकरिंग लॅबपासून उच्च शिक्षण संस्थांमध्ये अटर इन्क्यूबेशन सेंटरपर्यंत लक्ष दिले जात आहे. देशात स्टार्टअप्ससाठी हॅकथॉनची नवी परंपरा सुरू झाली असून जी देशातील तरुणाई, उद्योगजगत या दोघांसाठी अत्यंत मोठी शक्ती ठरत असल्याचे मोदींनी म्हटले आहे.