वार्ताहर/ यमकनमर्डी
स्पिरीट भरून जात असलेला टँकर हत्तरगी जवळील महामार्गावर उलटला. यामुळे काही नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले होते. सदर टँकर बेळगावहून कोल्हापूरकडे जात होता. दरम्यान चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा टँकर उलटल्याचे समजते. घटनास्थळी यमकनमर्डीचे पीएसआय रमेश पाटील आणि अग्निशमन दलाच्या कर्मचाऱयांनी भेट देऊन मार्गावरील वाहतूक रोखली. तसेच पर्यायी मार्गाने वाहतूक सुरू केली.
अज्ञात वाहनाच्या धडकेत दोघे ठार
अज्ञात वाहनाच्या धडकेत दोघे जागीच ठार झाले. ही घटना हत्तरगी-दड्डी मार्गावर गुरुवारी रात्री 9.30 वाजता घडली. इरण्णा बाबू तेरणी (वय 49, रा. हत्तरगी) आणि भरमण्णा गुरुसिद्ध मजती (वय 65, रा. दादबानट्टी) अशी मृतांची नावे आहेत. मृत दोघे दुचाकीवरून दड्डी मार्गे गुरुवारी रात्री हत्तरगीकडे जात होते. दरम्यान, त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने अचानक धडक दिली. यात दोघेही गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. घटनास्थळी यमकनमर्डी पोलिसांनी भेट देऊन पंचनामा केला. या घटनेची नोंद यमकनमर्डी पोलिसांत झाली आहे.