क्रीडा प्रतिनिधी /मडगाव
स्पेनचा मीडफिल्डर आणि गत आयएसएल फुटबॉल मोसमात एटीके मोहन बागान संघासाठी खेळलेला झावी फर्नांडिझने यंदाच्या मोसमात ओडिशा एफसीसाठी करार केला आहे. 32 वर्षीय झावी याने आपले आरंभीचे युवा फुटबॉल स्पेनच्या सीडीएफ पिझारॅलीस, सालामांसा आणि रियल माद्रीद संघाला खेळून केल्यानंतर तो रियल माद्रीद ब संघाला आपले सीनियरस्तरीय फुटबॉल खेळला आहे.
त्यानंतर झावी रोमानियाचा प्रोफेशनल क्लब एसीएस पोली तिमिसोआरा या संघासाठी खेळला. अझरबैझान आणि पोलंडमध्ये प्रोफेशनल फुटबॉल खेळल्यानंतर झावी 2019 मध्ये एटीकेला खेळण्यासाठी भारतात आला. 2020-21 मध्ये त्याने एटीकेशी परत एकदा करार केला. आयएसएलमध्ये झावी 37 सामने खेळला असून त्याने 2019-20 चेन्नईनविरुद्धच्या आयएसएलच्या अंतिम सामन्यात दोन गोलही केले आहेत. झावी स्पेनच्या 19 वर्षांखालील राष्ट्रीय संघातही खेळला आहे.
हैदराबाद एफसीनेही आपल्या संघात युवा फुटबॉलपटूंना स्थान दिले असून यंदाच्या मोसमात बचावपटू नीम दोर्जी तमांग आणि गोलरक्षक गुरमीत सिंगला करारबद्ध केले आहे. हे दोघेही गतमोसमात नॉर्थईस्ट युनायटेडला खेळत होते व त्यांचा हैदराबाद एफसीबरोबरचा करार प्रत्येकी तीन मोसमांचा असेल.
नीम दोर्जी हा सिक्कीमचा फुटबॉलपटू आय-लीग फुटबॉल स्पर्धेत तो शिलाँग लाजाँग एफसीसाठी 45 सामन्यांत खेळला आहे. नॉर्थईस्टसाठी तो 18 आयएसएल फुटबॉल सामन्यांत खेळला असून 19 वर्षांखालील भारतीय युवा फुटबॉल संघाचेही त्याने प्रतिनिधीत्व केले आहे.
21 वर्षीय गोलरक्षक गुरमीत सिंगनेही मान्यूएल मार्कीझच्या संघाशी करार केला आहे. गेल्या आयएसएल मोसमात गुरमीत आठ सामने खेळला आणि दोन सामन्यात क्लीन शीट ठेवण्यातही यशस्वी ठरला होता. या दोघांच्या समावेशाने हैदराबाद एफसीने पाच भारतीय फुटबॉलपटूंना यंदाच्या मोसमात करारबद्ध केले आहे. अनिकेत जाधव, आरेन डिसिल्वा व अब्दुल रबीह यांना यापूर्वीच हैदराबाद एफसीने करारबद्ध केले आहे.