वृत्तसंस्था/ लेस रोजास डी माद्रिद (स्पेन)
कतारमध्ये 20 नोव्हेंबरपासून खेळविल्या जाणाऱया फिफाच्या विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेसाठी शुक्रवारी स्पेनच्या फुटबॉल संघाची घोषणा केली. या स्पर्धेसाठी बार्सिलोना क्लबकडून खेळणारा आघाडीचा फुटबॉलपटू अन्सू फॅटीचा संघात समावेश करण्यात आला असून रॅमोसला वगळून अनपेक्षित धक्का दिला आहे.
बार्सिलोना फुटबॉल क्लबकडून आघाडीफळीत खेळणारा 20 वर्षीय अन्सू फॅटीला गेल्या सप्टेंबरमध्ये झालेल्या नेशन्स लिग फुटबॉल स्पर्धेत खेळण्याची संधी दिली नव्हती. तसेच चालू वर्षीच्या फुटबॉल हंगामात बार्सिलोना क्लबकडून त्याची कामगिरी म्हणावी तसी उठावदार झाली नाही. अन्सूने अलीकडच्या कालावधीत चार सामन्यात स्पेनचे प्रतिनिधीत्व करताना एकमेव गोल नोंदवला आहे. मात्र, गेल्या दोन वर्षांच्या फुटबॉल हंगामामध्ये वारंवार गुडघा दुखापतीमुळे त्याला संघात स्थान मिळू शकले नाही. आता कतारमध्ये होणाऱया फिफाच्या विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेसाठी प्रमुख प्रशिक्षक लुईस एन्रिक यांनी घोषित करण्यात आलेल्या 26 जणांच्या संघामध्ये फॅटीचा समावेश केला आहे.
दरम्यान या संघामध्ये बचावफळीत खेळणारा सर्जियो रॅमोसला वगळून अनपेक्षित धक्का दिला आहे. अनुभवी रॅमोसने पॅरीस सेंट जर्मन क्लबचे प्रतिनिधीत्व करताना बचावफळीत दजेंदार कामगिरी केली आहे. आतापर्यंत रॅमोस हा फुटबॉलपटू स्पेनचा एक अनुभवी आणि अव्वल म्हणून ओळखला जातो त्याने स्पेनच्या फुटबॉल इतिहासात 180 सामन्यात राष्ट्रीय संघाचे प्रतिनिधीत्व केले असून असा विक्रम करणारा तो स्पेनचा दुसरा फुटबॉलपटू आहे. अलीकडच्या कालावधीत रॅमोसला आपली तंदुरुस्ती आणि फॉर्म टिकवण्यासाठी झगडावे लागले आहे. 2020 च्या युरो चषक फुटबॉल स्पर्धेत सहभागी झालेल्या स्पेन संघातील 24 खेळाडूंचा आगामी फिफाच्या विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेसाठी संघात समावेश आहे. 2010 साली स्पेनने फिफाची विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धा जिंकली होती.
स्पेन फुटबॉल संघ- गोलरक्षक- युनाई सिमॉन, रॉबर्ट सांचेस, डेव्हिड रेया, बचावफळी- जोस गेया, जॉर्डी अल्बा, इरिक गार्सिया, ऍमेरिक लेपोर्टी, पॉ स्टोरेस, हुगो गुलियामोन, सिझर अझपिलीक्वेटा, डॅनी कार्वाजेल, मध्यफळी-रॉड्री कोके, मार्कोस लिओरेंटी, सर्जिओ बसक्वेटस्, गेव्ही, पेद्री गोन्जालेज, कार्लोस सोलेर, आघाडीफळी- डॅनी ओल्मो, पाबेलो, साराबिया, अल्वेरो मोराटा, अन्सू फॅटी, फेरेन टोरेस, मार्को ऍसेनसियो, निको विलियम्स आणि येरेमी पिनो.