ऑनलाईन टीम / माद्रिद :
स्पेनच्या आरगॉन प्रांतात कोरोना संक्रमित झालेले मिंक प्राणी आढळले आहेत. या प्राण्यांमधून माणसाला कोरोनाची बाधा होऊ शकते, या भीतीने स्पेनच्या आरोग्य विभागाने 92 हजार 700 मिंक प्राण्यांना मारण्याचा आदेश दिला आहे.
मिंक हा प्राणी भारतातील मुंगूस सारखा दिसतो. या प्राण्यांची लांबी साधारणपणे 3.50 सेमी तर वजन 2 किलोपर्यंत असते. या प्राण्यांच्या कातडीला (फर) फार किंमत असते, त्यांची कातडी कमावण्यासाठी अनेक पाश्चात्य देशांमध्ये मिंक प्राणी मोठ्या प्रमाणावर पाळले जातात.
स्पेनच्या आरगॉन प्रांतात एका शेतकऱ्याच्या बायकोला मे कोरोना व्हायरसची लागण झाल्यानंतर काही मिंक प्राण्यांनाही लागण झाली. त्यानंतर या महिलेचे पती आणि त्या पाळीव प्राण्यांच्या फार्मवर काम करणाऱ्या 6 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर ज्या मिंक प्राण्यांना कोरोनाची लागण झाली आहे, त्यांना वेगळे ठेवण्यात आले. 13 जुलैला या प्राण्यांची कोरोना टेस्ट केली असता 87 टक्के मिंक प्राण्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले.
या प्राण्यांद्वारे कोरोना व्हायरस माणसांमध्ये पसरू नये म्हणून या प्राण्यांची कत्तल करण्याचा निर्णय स्पेनने घेतला आहे, अशी माहिती आरगॉनचे कृषीमंत्री जोक्विन ओलोना यांनी दिली.