रेडमीच्या टीव्हींची सॅमसंगसह इतरांशी टक्कर- शाओमी विक्रीत वरचढ
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारतातील स्मार्ट टीव्हींची बाजारपेठ लवकरच तीव्र स्पर्धेची अनुभूती घेणार असल्याचे सांगण्यात येत आहे. स्मार्ट टीव्हींच्या किंमतीवरून अनेक कंपन्यांमध्ये स्पर्धा रंगताना येणाऱया काळात दिसली तर नवल वाटायला नको.
चिनी कंपनी शाओमी आपल्या रेडमी ब्रँड अंतर्गत भारतात स्मार्ट टीव्ही सादर करणार आहे. या गटात शाओमी गतीने विस्तार करण्याची योजना बनवत आहे. यांच्या टीव्हींची किमत किती असणार आहे याबाबत मात्र कंपनीने खुलासा केलेला नाही. सदरचे स्मार्ट टीव्ही हे कंपनी स्थानिक निर्माते डिक्सन यांच्याकडून बनवून घेणार आहे. भारतीय बाजारात सॅमसंग, एलजी, मायक्रोमॅक्स, वनप्लस, इनफिनीक्स आणि मोटोरोला यासारख्या स्मार्टफोन निर्मात्या कंपन्यांची स्मार्ट टीव्हींच्या निर्मितीची योजना तयार आहे.
दरम्यान कोरोनाच्या कालावधीत लॉकडाऊनमध्ये घरातील कुटुंबियांनी घरीच राहणे पसंत केले होते. तेव्हा त्या काळात स्मार्ट टीव्हींच्या विक्रीत चांगलीच वाढ दिसली. शिवाय ओटीटी प्लॅटफॉर्मवरील प्रसारणाची मागणीही वाढलेली दिसली.
शाओमी इंडियाचे (स्मार्ट टीव्ही) प्रमुख ईश्वर नीळकंठन यांनी सांगितले की, भारतात स्मार्ट टीव्हींची वाढलेली मागणी पाहून कंपनी भारतात टीव्हींच्या उत्पादनात वाढ करणार आहे. यासाठी रेडियंट यांच्याशी कंपनीने करारही केला आहे. स्थानिक पातळीवर कंपनी डिक्सनसोबत निर्मितीसाठी एकत्र काम करणार आहे.
50 लाख स्मार्ट टीव्हींची विक्री
शाओमी कंपनीने 50 लाख स्मार्ट टीव्हींची विक्री केली असून यात 30 लाख मेड इन इंडिया आहेत. युवकांना लक्ष करून रेडमी ब्रँडच्या स्मार्ट टीव्हींचे सादरीकरण आगामी काळात केले जाणार आहे. शाओमीचे भारतीय बाजारात 9 प्रकारचे टीव्ही 32 इंच ते 65 इंचाच्या आकारात 14 हजार 499 रुपये ते 54 हजार 999 रुपयांमध्ये उपलब्ध आहेत. कंपनीचे 2019 मध्ये भारतात 1.5 कोटी टीव्ही खपले आहेत. यात स्मार्ट टीव्हींचा वाटा तसा पाहिल्यास सिंहाचा राहिला आहे. यात 32 इंचाचा टीव्ही सर्वाधिक मागणीत आहे.