नगरविकासमंत्र्यांची स्मार्ट सिटी कंपनी- महापालिकांना सूचना
प्रतिनिधी/ बेळगाव
बेळगावसह राज्यातील सात शहरांमध्ये स्मार्ट सिटी योजनेंतर्गत विकासकामे राबविण्यात येत आहेत. या अंतर्गत आतापर्यंत 2646 कोटीची विकासकामे राबविण्यात आली आहेत. उर्वरित विकासकामे मार्च 2023 पर्यंत पूर्ण करण्याची सूचना नगरविकासमंत्री भैरती बसवराज यांनी सर्व स्मार्ट सिटी शहरांना केली आहे.
केंद्रशासनाने याबाबत सर्व राज्यांना सूचना केल्या असून यानुसार कर्नाटकात स्मार्ट सिटीचे काम सुरु असलेल्या महापालिकांना देखील स्मार्ट सिटीची कामे पूर्ण करण्याचा आदेश नगरविकासमंत्र्यांनी बजाविला आहे. बेंगळूर, मंगळूर, शिवमोगा, तुमकूर, दावणगिरी, बेळगाव आणि हुबळी-धारवाड आदी शहरांमध्ये स्मार्ट सिटी योजनेंतर्गत विकासकामे सुरु आहेत. या शहरांतील विकासाकरिता केंद्रशासनाकडून राज्यशासनाला 3600 कोटींचा निधी मिळाला आहे. यापैकी 2646 कोटींची विकासकामे राबवून निधी खर्च करण्यात आला आहे. तसेच सर्व शहरांचा आढावा घेतला असता, कोरोना विषाणूच्या प्रसारामुळे तसेच पूर परिस्थिती निर्माण झाल्याने स्मार्ट सिटी योजनेतील कामे रखडली होती. पण या कामांना प्राधान्य देवून मार्च अखेरपर्यंत पूर्ण करण्याची सूचना केली असल्याची माहिती नगरविकासमंत्र्यांनी पत्रकारांना दिली. तसेच म्हैसूर, बळ्ळारी, गुलबर्गा आणि विजापूर अशा चार शहरांचा समावेश या योजनेमध्ये करण्याची विनंती केंद्रशासनाकडे केली आहे.
या स्मार्ट सिटी योजनेंतर्गत 99 टक्के निविदा प्रक्रिया पूर्ण केली आहे. तसेच 90 टक्के कामाच्या वर्कऑर्डर देवून कामे पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरु आहे. उर्वरित कामे पूर्ण करण्यासाठी विकास कामांमधील अडथळे दूर करण्यात येत आहेत. काही ठिकाणी रस्त्यांचे कामे पूर्ण करण्यात असलेले अडथळे हटविण्यास विलंब झाला होता. त्यामुळे ही कामे रखडली होती. मात्र आता लवकरच ही कामेदेखील पूर्ण होतील. जर कामे पूर्ण झाली नसल्यास कंत्राटदारांवर कारवाई करून दंडवसूल केला जाईल. ठिकठिकाणी कामे करण्यास विलंब केल्यामुळे कंत्राटदारांकडून 3.38 कोटी दंड वसूल करण्यात आला असल्याचे नगरविकासमंत्री भैरती बसवराज यांनी सांगितले.