डे-नाईट कसोटीतील पहिली शतकवीर, दुसऱया दिवशीही पावसाचा व्यत्यय
वृत्तसंस्था/ गोल्ड कोस्ट
भारताची सलामीवीर स्मृती मानधनाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरू असलेल्या एकमेव डे-नाईट कसोटीच्या दुसऱया दिवशी शतक नोंदवत डे-नाईट कसोटीतील पहिली शतकवीर होण्याचा मान मिळविला. तसेच ऑस्ट्रेलियात कसोटी शतक नोंदवणारी ती भारताची पहिली महिला फलंदाजी बनली आहे. पहिल्या दिवसाप्रमाणे दुसऱया दिवशीही पावसाचा व्यत्यय आल्याने डिनर ब्रेकनंतर थोडय़ा वेळाने खेळ थांबवावा लागला. त्यावेळी भारताने पहिल्या डावात 5 बाद 276 धावा जमविल्या होत्या.
स्थानिक वेळेनुसार रात्री 8.30 वाजता पंचांनी खेळपट्टी व मैदानाची पाहणी केल्यानंतर दिवसाचा खेळ रद्द केल्याचे जाहीर केले. 101.5 षटकानंतर विजांचा गडगडाट सुरू झाल्यानंतर सर्व खेळाडू तंबूत परतले आणि नंतर मुसळधार पाऊसही सुरू झाल्याने उर्वरित सत्र वाया गेले. खेळ थांबवण्यात आला त्यावेळी दीप्ती शर्मा 12 व तानिया भाटिया शून्य धावावर खेळत होती. शेवटच्या दोन दिवशी प्रत्येकी 108 षटकांचा खेळ घेण्यात येणार आहे.
स्मृतीचे शतक
दिवसातील दुसऱया सत्रात भारताने दोन झटपट बळी गमविले. त्यात कर्णधार मिताली राज (30) व पदार्पणवीर यास्तिका भाटिया (19) यांचा समावेश होता. स्वीप व ड्राईव्हचे काही शानदार फटके लगावणाऱया मितालीचा सफाईदार खेळ पाहता ती मोठी धावसंख्या रचणार असे वाटत असताना ती धावचीत झाली. त्याआधी स्मृती मानधनाने शतक नोंदवताना काही नवे विक्रमही नोंदवले. महिलांच्या डे-नाईट कसोटीत पहिले शतक नोंदवण्याचा विक्रम तिने केला. याशिवाय ऑस्ट्रेलियन भूमीत कसोटी शतक नोंदवणारी ती भारताची पहिलीच महिला बनली आहे. 25 वर्षीय स्मृतीने 216 चेंडूत 22 चौकार, एक षटकाराच्या मदतीने 127 धावा जमविताना पूनम राऊतसमवेत दुसऱया गडय़ासाठी 102 धावांची भागीदारी नोंदवण्याचा भारतीय विक्रम केला. पहिल्या गडय़ासाठी तिने शफाली वर्मासमवेत 93 धावांची भागीदारी केली होती. 52 व्या षटकात एलीस पेरीला पुलचा फटका मारत तिने पहिले कसोटी शतक पूर्ण केले.
1 बाद 132 या धावसंख्येवरून भारताने दुसऱया दिवसाच्या खेळास प्रारंभ केल्यानंतर पहिल्या सत्राअखेर 3 बाद 213 अशी मजल मारली होती. एकाही धावेची भर न घालता दिवसातील दुसऱयाच षटकात स्मृती झेलबाद झाली होती. पण पेरीचा हा चेंडू नोबॉल असल्याचे स्पष्ट झाले आणि तिचा टिपलेला झेलही संशयास्पद होता. यानंतर तिने काही शानदार फटके लगावत शतकी मजल मारली. पण गार्डनरच्या गोलंदाजीवर ती शॉर्ट मिडऑफवर झेलबाद झाली. पूनम राऊत यष्टीमागे झेलबाद असल्याचे अपील झाल्यानंतर पंचांनी निर्णय दिलेला नसतानाही ती तंबूत परतली. तिने स्मृतीला चांगली साथ देत 36 धावा जमविल्या.
संक्षिप्त धावफलक ः भारतीय महिला प.डाव 101.5 षटकांत 5 बाद 276 ः स्मृती मानधना 216 चेंडूत 127, शफाली वर्मा 64 चेंडूत 31, पूनम राऊत 165 चेंडूत 36, मिताली राज 86 चेंडूत 30, यास्तिका भाटिया 40 चेंडूत 19, दीप्ती शर्मा खेळत आहे 12, तानिया भाटिया खेळत आहे 0, अवांतर 21. गोलंदाजी ः सोफी मोलिन 2-28, ऍश्ले गार्डनर 22 षटकांत 1-26, एलीस पेरी 1-54, ब्राऊन 0-49, मॅकग्रा 0-39).