फ्रान्सची 1-0 फरकाने बाजी, ‘ग्रूप ऑफ डेथ’मध्ये जर्मनी, हंगेरीसमोर आता अस्तित्वाचे आव्हान
म्युनिच / वृत्तसंस्था
मॅट हमेल्सच्या स्वयंगोलामुळे फ्रान्सचा संघ युरो चषक फुटबॉल स्पर्धेतील साखळी सामन्यात जर्मनीविरुद्ध बाजी मारण्यात यशस्वी ठरला. एफ गटातील या लढतीत हमेल्सला ल्युकास हर्नांडेझचा पास व्यवस्थित रोखता आला नाही आणि त्याच्याकडून स्वयंगोल झाला. जर्मन गोलरक्षक मॅन्युएल न्यूएरची अर्थातच यामुळे निराशा झाली.
फ्रान्सतर्फे किलियन एम्बापे व करीम बेन्झेमा यांनी ब्रेकनंतर गोलजाळय़ाचा अचूक वेध घेतला होता. पण, या दोन्ही वेळा ऑफसाईडचा नियम त्यांच्या आड आला. उत्तरार्धात मात्र वर्ल्ड चॅम्पियन्स फ्रान्सच्या मदतीला हमेल्सचा स्वयंगोल जणू धावून आला आणि त्यांच्या खात्यात 3 गुण जमा करुन गेला.
आणखी एका लढतीत पोर्तुगालने हंगेरीचा 3-0 असा फडशा पाडला असल्याने ग्रूप ऑफ डेथ नावाने ओळखल्या गेलेल्या या गटात फ्रान्स व पोर्तुगालचे संघ आता बरेच निश्ंिचत झाले आहेत. हंगेरी व जर्मनी यांना मात्र बाद फेरीत पोहोचण्यासाठी आता प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल, हे स्पष्ट आहे.
जर्मनीचे मॅनेजर या नात्याने ही शेवटची स्पर्धा असलेल्या ज्योकिम ल्यू यांनी येथे 3-4-3 अशा रणनीतीला पसंती दिली तर फ्रान्सने 4-3-3 अशा लाईनअपवर भर दिला. या निकालामुळे जर्मनीला आता शनिवारी होणाऱया पोर्तुगालविरुद्ध लढतीत कोणत्याही परिस्थितीत विजय संपादन करावाच लागेल, हे स्पष्ट झाले. दुसरीकडे, फ्रान्सचा संघ पुढील लढतीत हंगेरीला नमवून अंतिम 16 मधील आपले स्थान निश्चित करण्यासाठी प्रयत्नशील असणार आहे.
जेव्हा ग्रीनपीस प्रोटेस्टर पॅराशूटने अचानक प्रेक्षकांमध्ये कोसळतो!
जर्मनी-फ्रान्स यांच्यातील बहुप्रतिक्षित लढत सुरु होण्यासाठी काही मिनिटे बाकी असताना एक ग्रीनपीस प्रोटेस्टर पॅराशूटने थेट प्रेक्षकांमध्ये कोसळल्याने काही काळ गोंधळ निर्माण झाला. टीव्ही कॅमेऱयाशी असलेला संपर्क तुटल्यानंतर ही घटना घडल्याचे सांगण्यात आले. मात्र, जर्मनीचे खेळाडू ऍन्टोनियो व रॉबिन गॉसेन्सनी त्याच्याशी संवाद साधला आणि नंतर त्याला सुरक्षारक्षकांकडे स्वाधीन केले गेले. या पॅराशूटवर ‘कीक आऊट ऑईल ग्रीनपीस’ असा संदेश लिहिला होता.