स्वतःसोबतच इतरांना सक्षम आणि स्वावलंबी करणं महत्त्वाचं असतं. स्वतःच्या कौशल्याचा वापर करून कुटुंबाचं पालनपोषण करण्यासोबत इतरांच्या कुटुंबाला आधार देणारं काम केल्याने पैशांसोबतच निराळं समाधानही मिळतं. तामिळनाडूच्या पीर बानो यांनीही शिवणकामातून उत्पन्न मिळवायला सुरुवात केली. सोबतच त्यांनी परिसरातल्या महिलांनाही स्वतःच्या पायांवर उभं राहण्याचं बळ दिलं. पीर बानू यांच्या यशाची ही कहाणी…
पीर बानो तामिळनाडूतल्या पिरूवादी गावात लग्न करून आल्या. लग्नाच्या वेळी त्यांना माहेरून शिवण यंत्रही मिळालं होतं. पीर बानो यांना शिलाई येत होती. शाळेत असतानाच त्यांच्या भावाने त्यांना शिवणकाम शिकवलं होतं. शिकलेलं कधी वाया जात नाही हे अगदी खरं आहे. आयुष्यातल्या कोणत्या टप्प्यावर आपल्याला शिक्षण साथ देईल हे सांगता येत नाही. म्हणूनच शिक्षणाला महत्त्व दिलं जातं. हे शिक्षण कशाचंही असू शकतं. कौशल्यविकासासाठी घेतलेलं शिक्षणही उपयोगी पडू शकतं. शिवणकाम येत असल्यामुळे पीर बानो यांनी कुटुंबाच्या उत्पन्नाला हातभार लावण्यासाठी शिलाई करण्याचा निर्णय घेतला. त्यांना सासरच्या कुटुंबाची साथ लाभली. यामुळे पीर बानो स्वतः स्वावलंबी झाल्या. पीर बानो यांनी स्वतःच्या तिन्ही मुलांना शिलाई शिकवली.
त्याच काळात त्यांना एका संस्थेतर्फे घेतल्या जाणार्या बास्केट शिवण्याच्या कार्यशाळेची माहिती मिळाली. या प्रशिक्षण कार्यक्रमातून महिलांना बास्केट तयार करण्याचे धडे दिले जाणार होते. हे नवं कौशल्य आत्मसात करून आपण आपलं उत्पन्न वाढवू शकतो हे पीर बानो यांच्या लक्षात आलं. त्यांनी या प्रशिक्षण वर्गाला नाव घातलं. इथून बास्केट तयार करण्याचे धडे घेऊन त्यांनी स्वतःचा स्वयंसहाय्यता गट स्थापन केला. बिस्मी असं या गटाचं नाव आहे. 2006 मध्ये त्यांनी या गटाची स्थापना करून काम सुरू केलं. त्यांच्या या गटात महिलांची संख्या वाढू लागली. या गटातल्या पंधरा महिला केळ्याच्या धाग्यांपासून बास्केट तयार करून उत्तम कमाई करत आहेत.
या गटातल्या अनेक महिलांनी कर्ज घेऊन शिवणयंत्र विकत घेतलं. पीर बानो यांनी या महिलांना शाळेचे गणवेश, नाईट ड्रेस तसंच ब्लाउज शिवण्याचं प्रशिक्षण दिलं. आजवर त्यांनी 350 महिलांना शिवणकाम शिकवून स्वावलंबी बनवलं आहे. त्यांच्या प्रयत्नांमुळे या महिला आपल्या कुटुंबाचा गाडा समर्थपणे हाकत आहेत. त्यांना कोणापुढेही हात पसरावे लागत नाहीत. महत्त्वाची बाब म्हणजे पीर बानो गरीब तसंच गरजू महिलांकडून शिवणकाम शिकवण्याचे पैसे घेत नाहीत. पीर बानो गावासाठी बरेच प्रयत्न करत असतात. त्यांनी इथल्या अंगणवाडीतल्या मुलांसाठी खास खुर्च्या खरेदी केल्या. इथल्या वर्गांमध्ये पंखेही बसवून दिले. पीर बानो यांनी स्वतःच्या तीन मुलांनाही उत्तम शिक्षण देऊन स्वतःच्या पायांवर उभं केलं आहे. इच्छा असेल आपण स्वतःसोबतच इतरांचंही भलं करू शकतो, हे पीर बानो यांच्या उदाहरणावरून समोर येतं.