वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
खाण्यापिण्याच्या वस्तू घरपोच करण्याच्या व्यवसायामधील दिग्गज कंपन्या स्विगी-झोमॅटो यांनी आता मद्यविक्री घरपोच करण्याच्या सेवेला प्रारंभ केला आहे.
स्विगी-झोमॅटो कंपन्या लॉकडाऊनच्या काळात आतापर्यंत जीवनावश्यक घटकांचा पुरवठा करण्याची सेवा ग्राहकांच्या घरापर्यंत पोहच करण्यात वेगाने काम करत आहेत. परंतु केंद्राने कोविड19च्या संकटातही अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी प्रयत्न करण्यासाठी नियम व अटीवर काही गोष्टी सुरु करण्यात आल्या आहेत. यामध्ये सर्वाधिक महसूल कमाई करुन देणाऱया घटकांमध्ये मद्य विक्रीचा प्रथम क्रमांक लागतो. यामुळे आता ज्या भागात रेड झोन आकारण्यात आला आहे, त्या ठिकाणी स्विगी आणि झोमॅटो या कंपन्या मद्य विक्रीची घरपोच सेवा देणार असून याचा प्रारंभ रांचीतून झाला आहे.
सदर कंपन्यांनी गुरुवारी रांची या शहरामधून प्रथम मद्य विक्रीची घरोघरी सेवा सुरु केली आहे. याबाबत दोन्ही कंपन्यांनी माहिती दिली आहे. याच पद्धतीचा वापर करुन एका राज्यातून दुसऱया राज्यात मद्य विक्री करण्यासाठीच्या परवानगीबाबत संबंधीत राज्यांसोबत चर्चा करण्यात येत असल्याचेही यावेळी सांगण्यात आले. स्विगीकडून रांचीत सेवेचा प्रारंभ करण्यात आला असल्याने येत्या आठवडाभरात अन्य राज्यांमधील प्रमुख शहरांमध्ये ही सेवा कार्यरत करण्यात येणार असल्याचा विश्वास स्विगीकडून व्यक्त करण्यात आला आहे.
ऑनलाईन प्लॅटफार्म
संबंधीत ग्राहकांच्या ऑर्डर पूर्ण करण्यासाठी या कंपन्या ऑनलाईन प्लॅटफार्मचा आधार घेणार असल्याचीही माहिती आहे. यासाठी स्विगी-झोमॅटो यांचे ऍप डाऊनलोड करुन ग्राहकांनी आपल्याला हव्या असणाऱया मद्याची मागणी करण्याची सुविधा उपलब्ध होणार असल्याचे स्पष्टीकरण दोन्ही कंपन्यांच्या अधिकाऱयांनी दिले आहे.