सर्वसामान्य नागरिकांना हद्द समजण्यासाठी कॅम्प पोलिसांचा उपक्रम
प्रतिनिधी / बेळगाव
पोलीस स्थानकाच्या हद्दीच्या वादावरुन सर्वसामान्य जनतेची बऱयाचवेळा फरफट होत असते. ही बाब नुकत्याच घडलेल्या चोरीच्या प्रकरणानंतर स्पष्ट झाली असून सर्वसामान्य नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत होती. नागरिकांना नेमकी हद्द माहिती नसते. तसेच त्यांना या पोलीस स्थानकातून त्या पोलीस स्थानकामध्ये जाण्यास पोलीस भाग पाडतात. त्यामुळे आता पोलिसांनीही आपल्या हद्दीचे फलक लावण्यास प्रारंभ केला आहे.
महालक्ष्मीनगर, गणेशपूर येथील एका निवृत्त जवानाच्या घरी चोरी झाली होती. चोरटय़ांनी 2 लाखांचा ऐवज लांबविला. मात्र ही एफआयआर दाखल करुन घेण्यास बेळगाव ग्रामीण पोलीस आणि कॅम्प पोलिसांनी टाळाटाळ केली. त्यामध्ये त्या निवृत्त जवानाची फरफट झाली. जोतिबा अर्जुन पाटील यांनी दोन्ही पोलीस स्थानकाकडे जावून तक्रार नोंदविण्याचा प्रयत्न केला. मात्र तो परिसर आपल्या हद्दीत नाही, असे म्हणून त्यांची एफआयआर नोंदवून घेण्यास टाळाटाळ केली.
पोलिसांनी घेतला पुढाकार याबाबत तरुण भारतमधून ‘सीमेचा रक्षणकर्ता अडकला सीमा हद्दीच्या वादात’ असे वृत्त प्रसिद्ध झाले. त्यामुळे पोलिसांना चांगलीच जाग आली. तसेच कॅम्प पोलिसांनी तातडीने दुसऱयाच दिवशी आपल्या हद्दीचे फलक लावण्यास सुरूवात केली. एकूणच सर्वसामान्य जनतेलाही आता हद्द समजू दे म्हणून पोलिसांनी पुढाकार घेतल्याचे स्पष्ट दिसत आहे. याबाबत नागरिकांमध्ये मात्र जोरदार चर्चा सुरू आहे.