एसआयटीने बजावली नोटीस – 2 जून रोजी चौकशी
वृत्तसंस्था/ भोपाळ
मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांच्या अडचणी वाढल्या आहेत. माजी मंत्री उमंग सिंघार यांना अडकताना पाहून कमलनाथ यांनी आपल्याकडे हनिट्रपची पेन ड्राइव्ह असल्याचे म्हटले होते. या विधानांतर कमलनाथच अडचणीत आले आहेत. या पेन ड्राइव्हमध्ये भाजप नेत्यांच्या चित्रफिती असल्याचे संकेत देणारे त्यांचे विधान होते. मध्यप्रदेश हनिट्रप प्रकरणाची चौकशी करणाऱया एसआयटीने कमलनाथ यांना नोटीस बजावली आहे.
एसआयटीने नोटीस बजावून कमलनाथ यांच्याकडून पेन ड्राइव्ह मागितला आहे. तसेच एसआयटी याप्रकरणी कमलनाथ यांची चौकशी करण्यासाठी 2 जून रोजी श्यामला हिल्स येथील निवासस्थानी पोहोचणार आहे. एसआयटीच्या नोटीसनंतर कमलनाथ अडचणीत आल्याने काँग्रेस आता बचावाच्या भूमिकेत आहे.
माजी मंत्री उमंग सिंघार यांच्या मैत्रिणीने भोपाळमध्ये आत्महत्या केली होती. ही महिला मोहाली येथील रहिवासी होती. उमंग सिंघार तिच्यासोबत काही दिवसांनी विवाह करणार होते असे समजते. आत्महत्येनंतर पोलिसांनी सिंघार विरोधात गुन्हा नोंदविला होता. या पार्श्वभूमीवर कमलनाथ यांनी आमच्याकडे हनिट्रपची पेन ड्राइव्ह असल्याचा दावा केला होता.
हनिट्रप प्रकरण
कमलनाथ सरकारच्या काळात मध्यप्रदेशात हनिट्रपचे प्रकरण उघड झाले होते. याप्रकरणी 5 महिला आणि काही पुरुष वरिष्ठ अधिकारी आणि नेत्यांच्या चित्रफिती तयार करून त्यांना ब्लॅकमेल करत होते. या प्रकरणादरम्यान एक भाजप नेता आणि आयएएस अधिकाऱयाची चित्रफित इंटरनेटवर प्रसारित झाली होती.