हर्णे / वार्ताहर
दापोली तालुक्यातील हर्णे येथे गोठ्याला आग लागून एक बैल होरपळून मृत्युमुखी पडला. तसेच अन्य एक बैल, एक गाय गंभीररीत्या होरपळून जखमी झाले आहेत. ही घटना बुधवारी दुपारी घडली. या दुर्दैवी घटनेमुळे येलकर यांचे सुमारे एक लाख 20 हजार रुपयांचे नुकसान झालेले आहे.
तालुक्यातील हर्णे गावातील राणेवाडी येथील रमेश येलकर यांच्या मालकीचा हा गोठा होता. त्यांच्या गोठ्याच्या शेजारी घर आहे. या गोठ्यामध्ये दोन बैल व एक गाय बांधून ठेवलेली होती. येलकर हे बैल शेतीच्या कामाकरिता व सायंकाळी हर्णे बंदरात मच्छी वाहतुकी करीता बैलगाडीसह वापरत असत. मात्र यातील एक बैल मृत्यूमुखी पडल्याने त्यांच्यावर मोठे संकट कोसळले आहे. या घटनेचा पंचनामा तलाठी अमित शिगवण यांनी केला असून पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत