नवी दिल्ली
अमेरिकेतील सध्याचे भारताचे राजदूत हर्षवर्धन श्रृंगला हे पुढील विदेश सचिव होणार आहेत. विद्यमान विदेश सचिव विजय गोखले यांच्या निवृत्तीमुळे त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 1 मे 1962 रोजी मुंबईत जन्मलेले श्रृंगला हे भारताचे 33 वे विदेश सचिव होणार आहेत. श्रृंगला हे 1984 च्या आयएफएस तुकडीचे अधिकारी आहेत.
1988 च्या आयएफएस तुकडीचे अधिकारी तरणजीत सिंग संधू यांची अमेरिकेतील भारताच्या राजदूतपदी नियुक्ती करण्यात आली आहे. संधू हे यापूर्वी श्रीलंकेत राजदूत म्हणून कार्यरत हेते. जुलै 2013 ते जानेवारी 2017 या कालावधीत संधू यांनी वॉशिंग्टन डीसीमध्ये भारताच्या डेप्युटी चीफ ऑफ मिशनपदाची जबाबदारी सांभाळली आहे. श्रृंगला यांनी विदेश मंत्रालयात संयुक्त सचिव म्हणून काम करताना बांगलादेश, म्यानमार, मालदीव आणि श्रीलंका विभागाचे प्रभारीपद सांभाळले आहे. तसेच संयुक्त राष्ट्रसंघात भारताचे प्रतिनिधी म्हणूनही त्यांनी काम केले आहे. फ्रान्स, व्हिएतनाम, इस्रायल आणि दक्षिण आफ्रिकेत त्यांनी राजदूत म्हणून जबाबदारी सांभाळली आहे.