बालासोरमध्ये दोन क्षेपणास्त्र यंत्रणांचे परीक्षण
वृत्तसंस्था / बालासोर
हवाई सुरक्षा यंत्रणेसाठी बुधवारचा दिवस खास ठरला आहे. भारताने बुधवारी ओडिशाच्या बालासोरमध्ये मध्यम पल्ल्याच्या जमिनीवरून हवेत मारा करणाऱया एअर मिसाइल सिस्टीमचे यशस्वी परीक्षण केले आहे. डीआरडीओने नव्या प्रकारच्या तसेच जुन्या क्षेपणास्त्रांचे आधुनिकीकरण करत त्यांचे परीक्षण करण्याचे सत्र सुरूच ठेवले आहे.
डीआरडीआने सलग दोनवेळा जमिनीवरून हवेत प्रहार करणारे क्षेपणास एमआरएसएएम म्हणजेच मीडियम रेंज सरफेस टू एअर मिसाइलचे चांदीपूरच्या आयटीआरच्या लाँचिंग कॉम्प्लेक्समधून यशस्वी परीक्षण केले आहे. या क्षेपणास्त्राला विविध कोनांमधून जमिनीवरून हवेत डागण्यात आले. या परीक्षणात क्षेपणास्त्राने निर्धारित लक्ष्य भेदण्यास यश मिळविले आहे.
क्षेपणास्त्र परीक्षणाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने परीक्षण स्थळापासून दोन किलोमीटरच्या कक्षेत येणऱया गावांमधील सुमारे 800 कुटुंबांच्या 10 हजार लोकांना शिबिरात हलविले होते. याकरता या लोकांच्या भोजनासह भरपाईचीही व्यवस्था करण्यात आली होते. जिल्हा प्रशासनाकडून हिरवा कंदील मिळताच संरक्षण विभागाने एमआरएसएएम क्षेपणस्त्राचे सलग दोनवेळा यशस्वी परीक्षण केले आहे. यापूर्वी रविवारी म्हणजेच 27 मार्च रोजी या क्षेपणास्त्राचे सलग दोनवेळा यशस्वी परीक्षण करण्यात आले होते.
इस्रायलच्या मदतीने निर्मिती
ही क्षेपणास्त्र यंत्रणा इस्रायलच्या सहकार्याने डीआरडीएल हैदराबाद आणि डीआरडीओने संयुक्तपणे विकसित केली आहे. या अत्याधुनिक क्षेपणास्त्र यंत्रणेत अत्याधुनिक रडार, मोबाइल लाँचरसह कमांड अँड कंट्रोल समवेत इंटरसेप्टरचा देखील अंतर्भाव आहे.
क्षेपणास्त्राची वैशिष्टय़े…
दीर्घ पल्ल्यापर्यंतचा शत्रूचा हल्ला उधळून लावण्यास सक्षम
एकाचवेळी स्वतःचे लक्ष्य नष्ट करण्याची क्षमता
कॉम्बॅट मॅनेजमेंट सिस्टीम, रडार सिस्टीमचा अंतर्भाव
ध्वनीपेक्षा दुप्पट वेगाने वार करण्यास सक्षम