प्रतिनिधी/ पणजी
‘हाऊज बिल्डींग ऍडवान्स’ या कर्ज योजनेतील गेल्या 3 ते 4 महिन्यात पगारातून कापण्यात आलेल्या सरकारी कर्मचाऱयांची हप्त्यांची रक्कम कुठे गेली? याची विचारणा करण्यासाठी शुक्रवारी गोवा फॉरवर्डतर्फे लेखा संचालनालयाचे संचालक संतोष हुमरस्कर यांना घेराव घालून जाब विचारण्यात आला.
यावेळी गोवा फॉरवर्ड पक्षाचे उपाध्यक्ष दुर्गादास कामत, सरचिटणीस मोहनदास लोलयेकर, पक्षाचे नेते जगदीश भोबे व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
बॅंकतर्फे प्रत्येक सरकारी कर्मचाऱयांना संपर्क साधून त्यांच्यावर एनपीए करण्याची धमकी देत आहे. चुकी नसताना सरकारी कर्मचाऱयांना हा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत लेखा संचालकांना विचारल्या असता त्यांनी सांगितले की प्रत्येक खात्याने याची जबाबदारी घ्यायला हवी. याचा अर्थ असा की याबाबत लेखा संचालक बेखबर आहे. त्यांना यातील काहीच माहीत नसून त्यांचा या गोष्टीवर नियंत्रण नाही. असे मोहनदास लोलयेकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
हा मोठा घोटाळा आहे. सरकारी कर्मचाऱयांची हफ्त्यांची रक्कम कपात करुन घेतली जाते परंतु बँकपर्यंत पोहचत नाही तर ही रक्कम जाते कुठे याची माहीती मुख्यमंत्र्यांनी देणे गरजेचे आहे. या घटनेमुळे सध्या सरकारी कर्मचाऱयांची मानसीक परीस्थिती बिघडण्याच्या स्थितीत आहे. अशाने त्यांचे काही बरेवाईट झाल्यास याला सरकारच पूर्णपणे जबाबदार असणार आहे. सरकारी कर्मचाऱयांना अडचणीत अडकवून त्यांच्या पैशातून इफ्फि सारख्याचे आयोजन करण्याचे ठरविले आहे. याचा अर्थ सरकार फक्त कसे लोकांना लुटता यावे यावर लक्ष केंद्रीत करत आहे. असा आरोप लोलयेकर यांनी यावेळी केला.
‘हाऊज बिल्डींग ऍडवान्स’ हा विषय सध्या महत्वाचा विषय आहे. सरकारवर विश्वास ठेवत सरकारी कर्मचारी आपल्या खर्चाचा अंदाज घेत कर्ज काढत असतो, परंतु अचानक योजना बंद केल्यामुळे त्यांचे खर्चाचा अंदाज चुकत आहे व त्यांच्यावरील ताण वाढत आहे. कुठल्याही मंत्र्याला आपल्या खात्यात काय चालत आहे हे माहीत नाही. आम्ही सरकारला सांगु इच्छितो की कर्मचाऱयांना कुठल्याही प्रकारचा त्रास केल्यास आम्ही शांत बसणार नाही. तसेच बँकेने सरकारी कर्मचाऱयांची त्यांची चुकी नसताना त्रास केल्यास बँक फोडण्यास देखील आम्ही मागेपुढे पाहणार नाही. बँकेने कर्मचाऱयांकडे जाब न विचारता सरकारकडे जाब मागावा. अन्यथा ठिक होणार नाही असा इशारा दुर्गादास कामत यांनी दिला.