आजारामुळे कापावे लागले हात-पाय, आता अशाप्रकारे शिकविते शिक्षिका
एका प्राथमिक शाळेच्या शिक्षिकेची कहाणी सर्वांनाच प्रेरित करणारी आहे. स्वतःच्या कृतीतून मुलांना शिकविणाराच खरा शिक्षक असतो असे मानले जाते. अशीच एक शिक्षिका आहे कॅथ ट्रेगाना. एका आजारामुळे स्वतःचे हात-पाय तिला गमवावे लागले होते. तरीही ती शाळेत जाते आणि मुलांना शिकविते. तिने याकरता बायोनिक अवयव शरीराला लावून घेतले आहेत.
तापानंतर आयुष्य बदलले
47 वर्षीय कॅथला दोन वर्षांपूर्वी ताप आला होता. तापाची तीव्रता अधिक असल्याने तिला रुग्णालयात दाखल करावे लागले. याचदरम्यान तिला कार्डियक अरेस्ट देखील आले. ती वाचू शकणार नसल्याचे डॉक्टरांनी तिच्या कुटुंबीयांना सांगितले होते. माझी प्रकृती बघून त्वरित रुग्णवाहिकेला कॉल करणाऱयांनीच माझे जीवन वाचविल्याचे कॅथ सांगते.
जखमा चिघळल्या
कॅथ यांची एक जखम चिघळली होती, ज्याचा संसर्ग पूर्ण शरीरात वाढू नये म्हणून डॉक्टरांनी तिचे दोन पाय आणि दोन्ही हात कापले होते. अनेक शस्त्रक्रिया झाल्यावर कॅथला कित्येक महिन्यांपर्यंत आयसीयूमध्ये रहावे लागले. आजारी पडण्यापूर्वी ती इंटरनॅशनल स्कूल ऑफ लंडनमध्ये प्राथमिक शाळेच्या मुलांना शिकवत होती.
बरी होण्याचा आशावाद
एक दिवस मी पुन्हा वर्गात जाऊन मुलांना शिकवेन याचा मला विश्वास होता असे ती सांगते. कॅथच्या शाळेतील सहकाऱयांनी तिला मदत केली. तिच्यासाठी निधी गोळा केला, जेणेकरून तिला बायोनिक अवयव बसवून घेता येतील आणि पुन्हा मुलांना शिकविता येऊ शकेल.
ती आता पुन्हा शिकवितेय..
सध्या तिने हे बायोनिक अवयव बसवून घेतले आहेत. तिच्या वर्गातील मुले तिला पुन्हा पाहून आनंदी आहेत. मी या नव्या अवयवांचे आभार मानते, त्यांच्यामुळे मी पुन्हा शिकवू शकतेय, लिहू शकतेय, पुन्हा पुस्तके उचलू शकत असल्याचे कॅथने म्हटले आहे.