प्रतिनिधी /बेळगाव
‘हा माझा पशू बचाव दला’च्यावतीने शहीद भगतसिंग यांच्या 114 व्या जयंतीनिमित्त कोरोना योद्धय़ांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून माजी सैनिक लक्ष्मण माऊत, नूतन ग्राम पंचायत सदस्य दादासो सूर्यवंशी, प्रवीण रेडेकर, मनोहर सुणगार, अनिस सौदागर, डॉ. कोने व्यासपीठावर उपस्थित होते.
प्रारंभी शहीद भगतसिंग यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. लक्ष्मण माऊत यांनी शहीद भगतसिंग यांनी स्वातंत्र्य युद्धात दिलेल्या योगदानाबद्दल आजच्या तरुणाईला मार्गदर्शन केले. प्रीती कोचेरी, नारायण आणि अनिकेत या चिमुकल्यांनी भगतसिंग यांच्या जीवनचरित्राची माहिती सांगितली.
कोरोनायोद्धे रामू काका, गजानन गव्हाणे, डॉ. नितीन हुंदरे, नितीन पिंगट, कल्मुद्दिन शा आणि आशिष कोचेरी, विनायक केसरकर यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कोरोना काळात रुग्णांना ऑक्सिजन सिलिंडर पुरविणे, घरपोच औषधे पुरविणे, रुग्णांना दवाखान्यात दाखल करणे, कोरोनाबाबत जनजागृती करणे, लोकांना भोजन पुरविणे, तसेच मृत रुग्णांवर अंत्यसंस्कार करणे, अशी सेवा हे योद्धे आजही करत आहेत.
ऑप्शन डान्स क्रू चे नृत्य कलाकार कृष्णकांत, सुदर्शन आणि भरतेश यांनी आपल्या नृत्याविष्कारातून शहीद भगतसिंग यांना आदरांजली वाहिली. यावेळी कृष्णा पाटील व इतर मान्यवर उपस्थित होते. मंजुनाथ पै यांनी सूत्रसंचालन केले. चेतन डीगल यांनी आभार मानले.