@ प्रतिनिधी/ बेळगाव
लुटमार प्रकरणी कॅम्प पोलिसांनी अटक केलेल्या व सध्या हिंडलगा मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्धतेत असलेल्या कच्च्या कैद्याला कोरोनाची लागण झाल्याने कारागृहात खबरदारी वाढविण्यात आली आहे. तेथील प्रत्येक कर्मचारी पीपीई-कीट व फेसशिल्ड परिधान करुनच सेवा बजावू लागले आहेत.
29 जून रोजी अटक करण्यात आलेल्या त्या तरुणाला स्वतंत्र कक्षात ठेवण्यात आले होते. सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कारागृहात येणाऱया प्रत्येक कैद्याला किमान 20 दिवस ते महिनाभर स्वतंत्र कक्षात ठेवण्यात येते. त्यांची स्वॅब तपासणी अहवाल आल्यानंतरच त्यांना इतर बराकीत हलविण्यात येते. हा तरुणही स्वतंत्र कक्षात होता, अशी माहिती कारागृहाचे मुख्य अधीक्षक कृष्णकुमार यांनी दिली.
अहवाल पॉझिटिव्ह येताच रुग्णवाहिकेतून त्याला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले आहे. या कच्च्या कैद्यावर कैद्यांच्या वॉर्डमध्ये उपचार करण्यात येणार आहेत. या विभागात काम करणारे कर्मचारी, पोलीस व इतर कर्मचाऱयांनाही पीपीई-कीट सक्तीचे करण्यात आले आहे.
सध्या एखाद्या गुन्हेगारी प्रकरणात संशयिताला अटक झाल्यानंतर त्यांची स्वॅब तपासणी केली जाते. इतर नियमित चाचण्याही केल्या जातात. अशा गुन्हेगारांना कारागृहात नेल्यानंतर त्यांना स्वतंत्र ठेवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. पाच ते सहा दिवसानंतर स्वॅब तपासणी अहवाल येतो. त्यानंतरच अशा कैद्यांना इतर बराकीत हलविण्याचा विचार होतो.
शुक्रवारी रात्री 9 वाजेपर्यंत या कारागृहातील कैद्यांची संख्या 876 इतकी होती. यामध्ये तीन मुलेही आहेत. कैद्यांबरोबरच कारागृह कर्मचाऱयांच्या सुरक्षिततेसाठी खबरदारी घेण्यात आली आहे. कारागृहात कैद्यांना मास्क पुरविण्यात आले आहेत. कैद्यांसाठी म्हणून आणखी 20 हजार मास्क तयार ठेवण्यात आले आहेत, असे मुख्य अधीक्षक कृष्णकुमार यांनी सांगितले.