78 लाखाचा निधी मंजूर होऊनही विकासकामे राबविण्याकडे दुर्लक्ष
वार्ताहर / हिंडलगा
15 व्या वित्त आयोगातून मंजूर झालेल्या 78 लाख रुपयांच्या निधीतून विकासकामे सुरू करण्यास विलंब केल्याने संतप्त बनलेल्या सदस्यांनी पीडीओला धारेवर धरून जाब विचारल्याचा प्रकार शुक्रवारी (दि. 26) सकाळी हिंडलगा ग्राम पंचायत कार्यालयात घडला. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे पंचायतीत मोठय़ा प्रमाणात गोंधळ उडाला होता.
याबाबत ग्राम पंचायत सदस्यांनी दिलेल्या महितीनुसार 2020 साली राज्य सरकारकडून पंचायतीला 78 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला होता. पण सदर निधीचा विनियोग करण्यास पीडीओ गंगाधर नाईक यांनी चालढकल सुरू केली होती. त्यामुळे विनियोग करण्याआधीच निधी वाया जणार होता. त्यामुळे वारंवार विनंती करून देखील सदर निधीचा विनियोग करण्यास पीडीओनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याने सदस्यांमध्ये तीव्र नाराजी उलटली होती. परिणामी निधी परत जाण्याच्या भितीने नियोजित महालक्ष्मी यात्रेपूर्वी सदर निधीतून त्वरित विकासकामांना सुरुवात करण्याच्या मागणीसाठी शुक्रवारी संतप्त सदस्यांनी पीडीओ गंगाधर नाईक यांना चांगलेच धारेवर धरले. यावेळी पीडीओ नाईक यांनी थातुरमातूर उत्तरे दण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर मात्र सदस्यांनी थेट मंजूर निधीतून विकासकामांचे कल्मेश्वरनगर येथे ग्राम पंचायत अध्यक्ष नागेश मन्नोळकर यांच्या हस्ते भूमिपूजन करून विकासकामांचा शुभारंभ करण्यात आला.