वार्ताहर /हिंडलगा
हिंडलगा ग्राम पंचायत कार्यक्षेत्रात येणाऱया लक्ष्मीनगर (हिं.) येथील वॉर्ड क्रमांक 12 मधील ग्रा. पं. सदस्या स्नेहल विजय कोलेकर व सासरे रामा कोलेकर यांनी आपल्या घरासमोरील 30 फुटी रस्त्यावर अतिक्रमण करून कूपनलिका खोदली आहे. याबाबत रहिवासी सोमनाथ खेमाजी पाटील यांनी शनिवार दि. 3 रोजी पंचायत राज खाते, जि. पं., ग्रामीण आमदार व ता. पं. कार्यकारी अधिकाऱयांना निवेदन देऊन सदर अतिक्रमण हटविण्याची मागणी केली आहे.
याबाबत सोमनाथ पाटील यांनी दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, कोलेकर कुटुंबीयांनी आपल्या पदाचा गैरवापर करून सार्वजनिक रस्त्यावर अतिक्रमण केले आहे. याशिवाय रस्त्यातच अतिक्रमण करत आठ वर्षापूर्वी कूपनलिका खोदाई करून तेथील पाण्याचा वापर स्वतःसाठी केला आहे. पण, रस्त्यावर झालेल्या अतिक्रमणामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे सदर अतिक्रमण हटवून रस्ता खुला करून देण्याची मागणी केली आहे. तसेच कूपनलिका बंद करण्याची कारवाई न केल्यास सदर कूपनलिकेचा वापर हा पंचायतीकडे सोपवून सार्वजनिकांसाठी करावा, अशी देखील मागणी केली आहे.