बांगला देश पोलिसांची कारवाई, कट उघडकीस
ढाका / वृत्तसंस्था
नवरात्र काळात बांगला देशात हिंदूंविरोधात घडविण्यात आलेल्या हिंसाचाराच्या संशयित सूत्रधारास अटक करण्यात आली आहे. त्याचे नाव इक्बाल हुसेन असल्याची माहिती देण्यात आली. त्याला ढाक्याच्या कॉक्स बाजार परिसरातून शुक्रवारी ताब्यात घेण्यात आले. त्यानेच एका दुर्गादेवी मंडपात कुराणची प्रत ठेवल्याची सीसीटीव्ही फूटेजवरुन दिसून आले होते. त्या आधारावर त्याला अटक झाली.
दुर्गादेवीच्या मंडपात कुराण ठेवणे हा इस्लामचा अवमान आहे अशी आवई नंतर उठविण्यात आली होती. त्यामुळे हिंदूंच्या विरोधात प्रचंड हिंसाचार झाला. त्यात 6 हिंदूंचा बळी गेला. या हिंसाचाराचे पडसाद जगभर उमटले होते. विविध हिंदू संघटनांनी या हिंसाचाराचा तीव्र निषेध केला होता. बांगला देशमधील विविध वृत्तपत्रांनीही या हिंसाचारासाठी सरकारला धारेवर धरले होते.
त्यानंतर चौकशीची चक्रे वेगाने फिरुन अनेकांना अटक करण्यात आली. पोलिसांच्या हाती तपासाच्या वेळी महत्वाचे सीसीटीव्ही फूटेज लागले. कुराणाची प्रत एका मुस्लीमानेच दुर्गादेवीच्या मंडपात ठेवल्याचे त्यात दिसून आले. त्यामुळे हा हिंसाचार मोठय़ा कटकारस्थानाचा भाग होता हे सिद्ध झाले.
त्यानंतर या कटाच्या सूत्रधाराचा शोध लागून आता त्याला अटक करण्यात आली आहे. अफगाणिस्तानात तालिबानची सत्ता स्थापन झाल्यापासून इतर इस्लामबहुल देशांमध्येही धार्मिक कट्टरता वाढीस लागल्याचे दिसून येत आहे. याच पार्श्वभूमीवर बांगला देशातील हिंदुविरोधी हिंसाचाराकडे पाहिले जात आहे.