ऑनलाईन टीम / इस्लामाबाद :
पाकिस्तानच्या खैबर पख्तुनवा प्रांतातील हिंदू मंदिर पाडल्याप्रकरणी आणखी 45 जणांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात आतापर्यंत 100 जणांना अटक करण्यात आली असून, 350 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपींवर दहशतवाद विरोधी कायद्यान्वये गुन्हा दाखल असून, आरोपींना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
खैबर पख्तुनवा प्रांताच्या करक जिल्ह्यातील टेरी भागात हिंदू मंदिराचे विस्तारीकरण सुरू होते. पाच दिवसांपूर्वी जमावाने या मंदिरावर हल्ला चढवला. मंदिराची तोडफोड करत मंदिराला आग लावली. जमावाने हिंदू संत परमहंसजी महाराज समाधीचीही विटंबना केली होती.
या घटनेचे तीव्र पडसाद उमटल्यानंतर पोलिसांनी आरोपींवर कडक कारवाई केली. घटनेनंतर पाकिस्तान सरकारला जाग आली असून, हे मंदिर पाक सरकार पुन्हा बांधणार आहे.