राष्ट्रीय स्पर्धेतील पहिलेच जेतेपद, तामिळनाडूवर 11 धावांनी विजय, शुभम अरोराचे नाबाद शतक, कार्तिकचे शतक वाया
वृत्तसंस्था/ जयपूर
हिमाचल प्रदेशने बलाढय़ तामिळनाडूला पराभवाचा धक्का देत विजय हजारे करंडक स्पर्धेचे जेतेपद पटकावले. राष्ट्रीय स्तरावर मिळवलेले त्यांचे हे पहिलेच जेतेपद असून शांत व संयमी खेळ करणारा शुभम अरोरा (131 चेंडूत 13 चौकार, 1 षटकारासह नाबाद 136) हा त्यांच्या विजयाचा शिल्पकार ठरला.
अंधुक प्रकाशामुळे खेळ थांबविण्यात आला त्यावेळी व्हीजेडी पद्धतीनुसार हिमाचलला 11 धावांनी विजयी घोषित करण्यात आले. पंचांनी खेळ थांबवला त्यावेळी हिमाचल विजयाच्या मार्गावरच होते. त्यांना 15 चेंडूत 16 धावा करण्याची गरज होती आणि त्यांच्याकडे सहा गडी शिल्लक होते.
315 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना हिमाचलने तीन बळी लवकर गमविले. मात्र 24 वर्षीय सलामीवीर शुभम अरोराने अतिशय सावध व संयमी खेळ करीत पहिले लिस्ट ए शतक नोंदवले. त्याने अमित कुमारसमवेत (79 चेंडूत 74) मोठी भागीदारी करीत संघाचा डाव सावरला. 42 व्या षटकांत फॉर्ममध्ये असलेला कर्णधार रिषी धवनला साथीला घेत आणखी एक निर्णायक भागीदारी केली. धवनने 23 चेंडूतच नाबाद 42 धावा तडकावत संघाला विजयासमीप आणून ठेवले. यष्टिरक्षण करताना शुभमने तामिळनाडूच्या दिनेश कार्तिकचा 54 धावांवर झेल सोडला होता. कार्तिकने नंतर 103 चेंडूत 8 चौकार, 7 षटकारांसह 116 धावा फटकावल्या होत्या.
प्रथम फलंदाजी मिळाल्यावर तामिळनाडूच्या डावालाही खराब सुरुवात झाली होती. 14.3 षटकांतच त्यांची स्थिती 4 बाद 40 अशी झाली होती. कार्तिकने बाबा इंद्रजितसह (71 चेंडूत 80) पाचव्या गडय़ासाठी 167 चेंडूत 202 धावांची भागीदारी करीत संघाला भक्कम स्थिती प्राप्त करून दिली. नंतर शाहरुख खाननेही फटकेबाजी करीत 21 चेंडूत 3 चौकार, 3 षटकारांसह 42 धावा झोडपल्याने तामिळनाडूला 314 धावांपर्यंत मजल मारता आली होती. पण शेवटची हिमाचलच्या शुभमने झळकवलेले नाबाद शतकच निर्णायक ठरले. पंकज जस्वालने 59 धावांत 4, रिषी धवनने 62 धावांत 3 बळी मिळविले.
संक्षिप्त धावफलक ः तामिळनाडू 49.4 षटकांत सर्व बाद 314 (कार्तिक 116, बाब इंद्रजित 80, शाहरुख खान 21 चेंडूत 42, विजय शंकर 22, पंकज जस्वाल 4-59, धवन 3-62), हिमाचल प्रदेश 47.3 षटकांत 4 बाद 299 (शुभम अरोरा 131 चेंडूत नाबाद 136, प्रशांत चोप्रा 21, अमित कुमार 74, रिषी धवन 21 चेंडूत नाबाद 42, बाबा अपराजित 1-45, वॉशिंग्टन सुंदर 1-47).