गौरी आवळे / सातारा :
चला गं जाऊया बाईक वरून,
घेऊया आदी शक्तीचे दर्शन
असा एकाच आवाज सातारा शहरात घुमत आहे. तो आवाज ‘हिरकणी’ रायडर्स ग्रुपच्या टीम लिडर मनिषा फरांदे यांचा आहे. महिला घर, नोकरी सांभाळु शकतात. तशी बाईकही चालवू शकतात, असा विश्वास त्यांनी सर्वांमध्ये निर्माण केला आहे. आणि या विश्वासाच्या जोरावर येत्या 10 ऑक्टोबरला साडेतीन शक्तीपीठांचे दर्शन घेण्याचा प्रवास बाईकरून त्यांनी निश्चित केला आहे.
21 व्या शतकात महिला सर्वच क्षेत्रात आघाडीवर आहेत. मग बाईक चालवण्यात का मागे रहायचे, हा एकच विचार ‘हिरकणी’ रायडर्सच्या टीम लिडर मनिषा फरांदे यांच्या मनात आला. त्यांनी महिला सक्षमीकरणाची ढाल बनून महिलांना सक्षम करण्याचा विडा उचलला आहे. यांची सुरूवात त्यांनी येत्या नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने केली आहे.
सातारा शहरातील इतर महिला सदस्यांना सोबत घेवून त्यांनी ही मोहीम आखली आहे. या मोहिमेत अंजली शिंदे, मोना निकम-जगताप, शुभांगी पवार, अर्चना कुकडे, ज्योती दुबे, केतकी चव्हाण, भाग्यश्री केळकर, श्रावणी बॅनजी, उर्मिला भोजने या बाईकवरून साडेतीन शक्तीपीठांचे दर्शन घेणार आहेत. येत्या 10 ऑक्टोबरला त्यांचा हा प्रवास सुरू होणार असून सुरूवातीला त्या कोल्हापूर येथील अंबाबाई देवीचे दर्शन घेणार आहेत. नंतर तुळजापूर, नादेंड, माहूर, वाशी, औरंगाबाद, नाशिक, वणी आणि पुन्हा सातारा असा 1 हजार 868 किलो मीटरचा प्रवास त्या बाईकवरून करणार आहेत. या राईडर्सच्या माध्यमातून त्या 10 जिल्हे, 24 तालुक्यातून जाताना रस्ते सुरक्षा, स्तनाचा कॅन्सर, महिला सक्षमीकरणाची जनजागृती करणार आहेत. साताऱ्यातून बाईकवर जाणारा हा पहिला महिलांचा गुप आहे. यामुळे सातारकरांकडून त्यांच्यावर शुभेच्छाचा वर्षाव करण्यात येत आहे. या राईडर्सची नोंद इंडिया बुक ऑफ रेकार्डमध्ये होणार आहे. या राईडर्स शक्तीच्या माध्यमातून अनेक महिलांना प्रोत्साहन मिळावे हा हेतू या ‘हिरकणी’ रायडर्स’ चा आहे.
महिला सक्षमीकरण हाच आमचा ध्यास….
महिला सक्षम झाली पाहिजे हे सगळेच म्हणतात. पण आम्ही महिलांना सक्षम करण्यासाठी कंबर कसली आहे. यामुळे ‘हिरकणी’ रायडर्स च्या माध्यमातून आम्ही कामाला सुरूवात केली आहे. आता थांबायचे नाही. तर पुढे पुढे वाटचाल करायची आहे. आणि सातारा शहरासह जिह्यातील, महाराष्ट्रातील महिलांचा आवाज बुलंद करायचा आहे. विविध क्षेत्रात महिलांना संधी मिळत आहे, त्या संधीचे सोने करत त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवयाचा आहे.
सौ. मनिषा फरांदे,
टीम लिडर, ‘हिरकणी’ रायडर्स