सरकारी मार्गसूचीनुसार केले दफनविधी : स्वॅब तपासणी अहवालानंतर कारण स्पष्ट होणार
प्रतिनिधी/ बेळगाव
कोरोनाग्रस्तांच्या संपर्कात असलेल्या हिरेबागेवाडी येथील एका 80 वषीय वृद्धेचा सोमवारी सकाळी मृत्यू झाला आहे. त्यामुळे एकच खळबळ माजली असून जिल्हा प्रशासनाने ठरवून दिलेल्या मार्गसूचीनुसार त्या वृद्धेचा दफनविधी करण्यात आला आहे.
जिल्हाधिकारी डॉ. एस. बी. बोम्मनहळ्ळी यांनी यासंबंधीची माहिती दिली असून सोमवारी सकाळी 10.30 वाजण्याच्या सुमारास 80 वषीय वृद्धेचे निधन झाले. कोरोनाग्रस्त युवकाच्या संपर्कात ती होती. त्यामुळे तिच्या घशाचे स्वॅब जमविण्यात आले असून तपासणीसाठी ते प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. प्रयोगशाळेचा अहवाल आल्यानंतरच या वृद्धेचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? याचा उलगडा होणार आहे.
हिरेबागेवाडी येथील रुग्ण क्रमांक 224 च्या संपर्कात ही वृद्धा होती. या युवकाच्या संपर्कातील एकूण 21 जणांना आरोग्य विभागाने क्वारंटाईनमध्ये ठेवले असून त्यांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. 3 एप्रिल रोजी हिरेबागेवाडी येथील एका तरुणाला कोरोनाची लागण झाल्याचे पहिल्या अहवालात स्पष्ट झाले होते. त्यानंतर त्या तरुणाची आई, वडील आणि भावालाही कोरोनाची लागण झाली आहे. रविवारी आरोग्य विभागाने प्रसिद्ध केलेल्या हेल्थ बुलेटिनमध्ये रुग्ण क्रमांक 228 च्या संपर्कातून 38 वषीय युवकाला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. आता या 38 वषीय युवकाच्या संपर्कातील वृद्धेचा सोमवारी सकाळी मृत्यू झाला आहे. हृदयघाताने या वृद्धेचा मृत्यू झाला असावा, अशी प्राथमिक माहिती आहे. स्वॅब तपासणी अहवाल उपलब्ध झाल्यानंतरच तिच्या मृत्यूचे निश्चित कारण समजू शकणार आहे, असे जिल्हाधिकाऱयांनी सांगितले आहे.
तपासणीतून सटकली अन् मृत्यूच्या दाढेत अडकली
रविवारी आरोग्य विभागाने प्रसिद्ध केलेल्या हेल्थ बुलेटिनमध्ये हिरेबागेवाडी येथील 38 वषीय युवकाला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते. आरोग्य विभाग, आशा कार्यकर्त्या, पोलीस, महसूल खात्याच्या अधिकाऱयांनी या युवकाच्या संपर्कातील नागरिकांचा शोध घेऊन त्यांना क्वारंटाईनमध्ये हलविण्याचा उपक्रम हाती घेतला. त्यावेळी सदर 80 वषीय वृद्धा परसातील दरवाजातून बाहेर पडली व त्या पथकाला तिने गुंगारा दिला. 21 जणांना तेथून बेळगावला हलविण्यात आले. त्याचवेळी 10.30 वाजण्याच्या सुमारास या वृद्धेचा मृत्यू झाला.
लपवाछपवीमुळे जीवाला धोका
तबलिग जमातच्या धर्मसभेत भाग घेऊन गावी परतल्याची माहिती लपवून ठेवणाऱया हिरेबागेवाडी येथील एका युवकासह सात जणांवर एफआयआर दाखल करण्यात आले असून या लपवाछपवीमुळे आशा कार्यकर्त्या, आरोग्य विभागाचे कर्मचारी व पोलिसांच्या आरोग्यालाही कोरोनाचा धोका निर्माण झाला आहे.