विविध ठिकाणच्या प्रकल्पांचा समावेश – कोरोना लाटेच्या पार्श्वभूमीवर निर्णय
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
देशामध्ये पुन्हा कोरोनाचे सावट गडद होत असल्याने कंपनीपुढे चिंतेचं वातावरण निर्माण झाले आहे. याचा परिणाम हा पुन्हा एकदा लहान मोठय़ा व्यवसायावर होण्यास सुरुवात झाली आहे. यामध्ये दिग्गज दुचाकी निर्मितीमधील कंपनी हिरोमोटो कॉर्प यांनी देशातील आपले सर्व प्रकल्प येत्या 1 मे पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती आहे.
हिरोने आपले सर्व प्रकल्प आणि मॅन्युफॅक्चर्स (निर्मिती) केंद्रे बंद केली आहेत. सदरचे कारखाने 22 एप्रिल ते 1 मे 2021 पर्यंत बंद ठेवणार असल्याचेही कंपनीने स्पष्ट केले आहे. हिरोकडून देण्यात आलेल्या स्पष्टीकरणानुसार सध्याच्या निर्मिती प्रकल्पात आवश्यक तेवढेच कामगार मेंटेनन्स पाहण्याचे काम करणार आहेत. तसेच कंपनीला ग्लोबल पार्ट्स सेंटर (जीपीसी) बंद करावे लागणार आहे. पुन्हा नव्याने आलेल्या कोरोना संकटामुळे ही स्थिती उदभवल्याची माहिती कंपनीने दिली आहे. परिस्थितीला अनुसरून आवश्यक ती सुरक्षेची पावले उचलली जात असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे. सामाजिक अंतर, मास्क सारख्या उपाययोजना काटेकोरपणे राबवल्या जात आहेत.
6 प्रकल्प बंद
हिरो मोटोकॉर्पचा निर्मिती प्रकल्प हरियाणातील गुरुग्राम आणि घारुहेरामध्ये आहे. यासह आंध्र प्रदेशातील चित्तुर, उत्तराखंडातील हरिद्वार, राजस्थानच्या नीमराना आणि गुजरातच्या हलोलमध्ये निर्मिती कारखाने कार्यरत आहेत. या ठिकाणचे मिळून सर्व कारखान्यांमध्ये जवळपास 80,000 पेक्षा अधिक कर्मचारी काम करत असल्याचेही हिरोने नमूद केले आहे
दुचाकी बाजारात हिरोचा दबदबा
मार्चमध्ये दुचाकीमध्ये 35.26 टक्क्यांची नेंदणी राहिली आहे. परंतु यामध्ये सर्वाधिक नफा कमाईत मात्र हिरोमोटो कॉर्प राहिली आहे. मार्चमध्ये हिरोच्या 3,96,573 वाहनांची नोंदणी झाली आहे. तर दुसऱया स्थानी 26.19 टक्क्यासोबत होंडा मोटरसायकल राहिली आहे.