तालुका कुटुंबकल्याण अधिकारी डॉ. उदय कुडची यांची माहिती
वार्ताहर/ हुक्केरी
कोरोनावरील लसीकरणाची ‘ड्राय रन’ म्हणजेच रंगीत तालीम शनिवारी येथील सरकारी आरोग्य केंद्रात पार पडली. सकाळी 9 ते दुपारी 2 पर्यंत झालेल्या लसीकरणाच्या या सरावसत्रात 180 जणांनी भाग घेतला. आगामी काही दिवसांमध्ये लसीकरण मोहीम राबविण्यात येणार असल्याने हे सरावसत्र आयोजित करण्यात आल्याची माहिती तालुका कुटुंबकल्याण अधिकारी डॉ. उदय कुडची, डॉ. एम. एम. नरसण्णवर व मोहिमेचे प्रमुख एच. एम. सिद्धराम यांनी दिली.
काही दिवसांपूर्वी हुक्केरी तालुक्यात 1800 जणांनी आपली नावे नोंदविली आहेत. तसेच त्यांनी जन्म तारीख, फोटो, ओळखपत्र व मोबाईल क्रमांक दिले आहेत. यामधील 180 जणांना मोबाईलवर व्हिडीओद्वारे संदेश पाठवून त्यांना बोलावून घेत त्यांच्यावर लसीकरण प्रक्रियेची रंगीत तालीम घेण्यात आली. यामध्ये सरकारी दवाखान्यातील वैद्याधिकारी, कर्मचारी, अंगणवाडी व आशा कार्यकर्त्यांचा समावेश आहे, अशी माहितीही डॉ. कुडची यांनी माहिती दिली. यावेळी एच. एम. सिद्धराम, डॉ. कुडची, डॉ. नरसण्णवर, कर्मचारी संतोष कटगेरी, रोहिणी अलबाळ, सचिन कोकणी, मंजुनाथ बेटगिरी, श्रीदेवी शिरप्पन्नवर व इतर कर्मचारी उपस्थित होते.
बेळगावातही रंगीत तालीम
कोरोनावरील लसीकरणाची ‘ड्राय रन’ म्हणजेच रंगीत तालीम शनिवारी बेळगावमध्ये घेण्यात आली. वंटमुरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात झालेल्या या तालीमवेळी जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ, आरोग्य व कुटुंब कल्याण खात्याचे उत्तर कर्नाटकाचे साहाय्यक संचालक डॉ. आप्पासाहेब नरट्टी, जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. शशिकांत मुन्याळ, जागतिक आरोग्य संघटनेचे बेळगाव जिह्याचे पदाधिकारी डॉ. सिद्धलिंगय्या, आरोग्याधिकारी डॉ. गडाद, तालुका आरोग्याधिकारी डॉ. संजीव डुमगोळ उपस्थित होते.
या तालीमसाठी 25 जणांची निवड करण्यात आली असून प्रामुख्याने पहिल्या तालीमवेळी आशा कार्यकर्त्या आणि अंगणवाडी कार्यकर्त्यांची निवड करण्यात आली. बेळगावबरोबरच कित्तूर येथील आरोग्य केंद्रांमध्ये ही तालीम पार पडली. यावेळी आशा कार्यकर्त्या, अंगणवाडी कार्यकर्त्या यांना लस प्रक्रियेची माहिती देण्यात आली. त्याचा सर्व तपशील संकलित करण्यात आला. जिल्हाधिकाऱयांनी तपशील तसेच लस देण्याची प्रक्रिया या संदर्भात सर्व माहिती घेऊन पाहणी केली.