जागतिक यादीत पहिल्यांदाच एलॉन मस्क अग्रस्थानी
वृत्तसंस्था/ मुंबई
हुरुन ग्लोबल रिच लिस्ट 2021 च्या यादीमध्ये जागतिक स्तरावर भारतातील सुप्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी हे आठव्या स्थानावर राहिले आहेत. जगभरातील श्रीमंतांची यादी हुरुन ग्लोबलने नुकतीच सादर केली आहे.
कोरोना महामारीमुळे मागच्या वर्षी संपूर्ण जगातच अस्थिरता राहिली होती. पण दुसरीकडे श्रीमंतांच्या संपत्तीत विक्रमी वाढ होत गेल्याचे दिसून आले. हुरुनने आपल्या यादीमध्ये 3 हजार 228 अब्जाधीशांचा समावेश केला आहे. यामध्ये भारतातर्फे रिलायन्सचे मुकेश अंबानी हे सर्वाधिक श्रीमंत असल्याचे दिसून आले.
6.05 लाख कोटी रुपयांच्या संपत्तीसह मुकेश अंबानी हे भारतातील सर्वाधिक श्रीमंत म्हणून गणले गेले आहेत, ज्यांनी या जागतिक यादीमध्ये आठवे स्थान प्राप्त केले आहे. सदरच्या यादीमध्ये टेस्लाचे सीईओ एलॉन मस्क हे आघाडीवर राहिले आहेत. पहिल्यांदाच मस्क यांना या यादीमध्ये पहिले स्थान काबीज करण्यात यश मिळाले आहे.
14.41 लाख कोटी रुपयांच्या संपत्तीसह ते पहिल्या स्थानावर आहेत. मस्क यांच्यानंतर 13.82 लाख कोटीसह अमेझॉनचे सीईओ जेफ बोजेस हे दुसऱया, 8.34 लाख कोटीसह एलव्हीएमएचचे बेर्नार्ड अर्नाल्ट तिसऱया स्थांनी राहिले आहेत. चौथ्या स्थानी बिल गेट्स आणि पाचव्या स्थानी मार्क झुकरबर्ग आहेत. दुसरीकडे या यादीमध्ये पहिल्यांदाच भारताशेजारचा देश बांगलादेशमधील तीन अब्जाधीशांनाही स्थान मिळाले आहे. यादीमध्ये भारतातर्फे अंबानीनंतर गौतम अदानी आणि कुटुंबीय (2.34 लाख कोटी रुपये) 48 व्या स्थानावर आहेत. तर शिव नाडर 58 व्या स्थानावर आहेत.