वृत्तसंस्था/ दुबई
शिवा थापा (64 किलो गट) व मोहम्मद हुसामुद्दिन (56 किले गट) यांनी आशियाई बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये भारताला चांगली सुरुवात करून देताना आपापल्या प्रतिस्पर्ध्यावर शानदार विजय मिळवित उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळविले.
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत कांस्य मिळविलेल्या हुसामुद्दिनने पहिल्या फेरीच्या लढतीत कझाकस्तानच्या मखमुद साबीरखानचा पराभव केला. त्यानंतर या स्पर्धेत सलग पाचवे पदक जिंकण्याच्या प्रयत्नात असणाऱया शिवा थापाने कीर्गिझस्तानच्या दिमित्री पचिनचा पराभव केला. दोघांनीही 5-0 अशाच गुणफरकाने विजय मिळविला. हुसामुद्दिनला पुढील लढत कठीण जाणार असून वर्ल्ड व आशियाई क्रीडा स्पर्धेचा चॅम्पियन उझ्बेकच्या मिरअझिजबेक मिर्झाहलिलोव्हशी ही लढत होत आहे. मिर्झाहलिलोव्हला या गटात अग्रमानांकन मिळाले असून तो विद्यमान विजेताही आहे. थापाची पुढील लढत कुवैतच्या नादेर ओदाहशी होईल. नादेरला पहिल्या फेरीत बाय मिळाला होता.
गुणांवरून हुसामुद्दिनने सहज विजय मिळविला असेल, असे वाटत असले तरी त्याला या लढतीत 19 वर्षीय आशियाई युवा चॅम्पियन असलेल्या साबीरखानविरुद्ध बराच संघर्ष करावा लागला. दोघांनीही एकमेकांवर जबरदस्त ठोसे लगावत आक्रमक खेळाचे प्रदर्शन केले. पण हुसामुद्दिन बचावात साबीरखानपेक्षा सरस असल्याचेच सिद्ध झाले. साबीरखान प्रतिआक्रमणावर जास्त विसंबून राहिला होता. याउलट थापाला मात्र अशा प्रतिकाराला सामोरे जावे लागले नाही. पचिनने पहिला ठोसा लगावण्यासाठीही बराच वेळ घेतला. तो फटके मारता मारताच मागे घेत होता, त्याचा लाभ थापाने उठविला. थापाला त्याचा बचाव भेदण्यासाठी फारसे प्रयासच करावे लागले नाहीत. त्याने तीनही फेऱयांत वर्चस्व राखत तीनही रेफ्रीकडून एकतर्फी कौल मिळविला.
स्पर्धेच्या दुसऱया दिवशी सिमरनजित कौर (60 किलो), साक्षी (54 किलो), जस्मिन (57 किलो) व संजीत (91 किलो) यांच्या शेवटच्या आठ फेरीतील लढती होणार आहेत. भारत व संयुक्त अमिरात बॉक्सिंग फेडरेशन यांनी एकत्रित मिळून ही स्पर्धा आयोजित केली आहे. 17 देशातील 150 स्पर्धकांनी यात भाग घेतला आहे.