ऑनलाईन टीम / गुवाहाटी :
भाजप नेते हेमंत बिस्वा शर्मा यांनी आज दुपारी 12 वाजता आसामच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. श्रीमंत शंकरदेव कलाक्षेत्र येथे पार पडलेल्या शपथविधी सोहळ्यात राज्यपाल जगदीश मुखी यांनी शर्मा यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. शर्मा यांच्यासह 13 कॅबिनेट मंत्र्यांनीही यावेळी शपथ घेतली. या शपथविधी सोहळ्याला भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्यासह अन्य वरिष्ठ नेते उपस्थित आहेत.
शर्मा यांनी रविवारी राजभवनात राज्यपाल जगदीश मुखी यांची भेट घेऊन सरकार स्थापनेचा दावा केला. राज्यपालांनी हा दावा मान्य करत शर्मा यांना आज सरकार स्थापन करण्यासाठी आमंत्रित केले होते. त्यानुसार आज शर्मा यांचा शपथविधी पार पडला.
दरम्यान, मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्यापूर्वी शर्मा यांनी आज सकाळी माता भगवतीचा आशीर्वाद घेतला. कामाख्या मंदिर आणि डोल गोविंद मंदिरात पूजा केली होती.