ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
ओमायक्रॉन व्हेरिएंटने बाधित रुग्णांना रात्रीच्या वेळी मोठय़ा प्रमाणात घाम येण्याची समस्या जाणवू शकते. बाधित रुग्ण थंड वातावरणात असेल तरीही त्याचे कपडे आणि अंथरुण घामाने ओले होऊ शकते. तसेच त्याला शारीरिक वेदना होऊ शकतात. हे या व्हेरिएंटचे नवे लक्षण असल्याचे दक्षिण आफ्रिकेमधील आरोग्य विभागाच्या जनरल प्रॅक्टिशनर डॉ. उनबेन पिल्ले यांनी म्हटले आहे.
पिल्ले म्हणाले, यापूर्वी कोरोना संसर्ग झाल्यावर तीव्र ताप, खोकला, श्वास घेण्यास त्रास, छातीमध्ये वेदना, रक्तामध्ये ऑक्सिजनची कमतरता यासारखी लक्षणे दिसत होती. मात्र, दक्षिण आफ्रिकेत आढळलेल्या ओमायक्रॉन व्हेरिएंटचा जगाने धसका घेतला. मात्र, हा व्हेरिएंट डेल्टा व्हेरिएंटपेक्षा घातक नाही. तो स्प्रेडर आहे. लसीकरण झालेले रुग्ण या आजारातून लवकर बरे होत असल्याचे आजवरच्या रुग्णांमधून दिसून आले आहे.
ओमायक्रॉनची लागण झालेल्या रुग्णांना रात्रीच्या वेळी अती प्रमाणात घाम येऊ शकतो. तसेच कोरडा खोकला, सौम्य ताप, थकवा आणि शरीरामध्ये वेदना ही लक्षणे दिसून येऊ शकतात, असेही पिल्ले यांनी सांगितले.