कोरोनाग्रस्त महिलेला हॉस्पिटलात : प्रवेश न दिल्याने कारमध्ये मृत्यू
प्रतिनिधी / मडगाव
कोरोना महामारीने गोव्यात सर्व सीमा ओलांडल्या आहेत. हॉस्पिटलात रूग्णांना दाखल करून घेण्यास जागाच शिल्लक नाही. कोरोनाचे रूग्ण हॉस्पिटलच्या दारात पोचले तरी त्यांना दाखल करून घेतले जात नाही. काल मंगळवारी असाच प्रकार मडगावच्या जिल्हा इस्पितळात घडला. एका महिलेला कारमध्येच मृत्यू येण्याची घटना घडली. या घटनेतून गोव्याची परिस्थिती किती भयानक आहे, याचे चित्र स्पष्ट झाले आहे.
बेताळभाटी येथील एका 49 वर्षीय महिलेला काल मंगळवारी पहाटे 5.30 च्या दरम्यान, श्वासोच्छश्वासाची समस्या जाणवू लागली, तेव्हा तिच्या पतीने बेताळभाटीचे सरपंच कॉस्तानसियो फर्नांडिस यांच्याकडे संपर्क साधून मदतीची विनंती केली. सरपंच फर्नांडिस यांनी अगोदर कोरोना चाचणी घेतली का याची विचारपूस केली असता सोमवारी मडगावच्या अपोलो हॉस्पिटलात कोरोना चाचणी घेतली, पण तिचा अहवाल आला नसल्याचे सांगितले. यावेळी सरपंचानी त्याला पत्नीला मडगावच्या जिल्हा इस्पितळात घेऊन जाण्याचा सल्ला दिला.
सकाळी 6 वा. या महिलेला कारमधून जिल्हा इस्पितळात आणले तर सकाळी 11 वाजेपर्यंत तिला इस्पितळात प्रवेशच दिला गेला नाही. पतीने इस्पितळात किती जणांकडे विनंत्या व हात जोडून याचना केल्या तरी कुणीच दखल घेतली नाही. दुसऱया बाजूने ही महिला कारमध्ये श्वासोच्छश्वास घेण्यास त्रास होत नसल्याने तळमळत होती. सकाळी 11च्या दरम्यान तिने कारमध्येच अखेरचा श्वास घेतला.
कारमध्ये मृत्यू आलेल्या आपल्या पत्नीचा मृतदेह घेऊन पती घरी परतला. डॉक्टराकडून मृत्यू झाल्याचे प्रमाणपत्र मिळत नसल्याने संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत या महिलेचा मृतदेह कारमध्येच राहिला. पतीने पोलिसांकडे संपर्क साधला, आरोग्य केंद्र व जिल्हा इस्पितळात संपर्क साधला तरी कोणीच सहकार्य करीत नसल्याने शेवटी त्याने पत्नीवर अंत्यसंस्कार करण्यासाठी सरपंच फर्नांडिस यांना विनंती केली. नंतर सरपंचांनी स्थानिक आमदार विल्प्रेड उर्फ बाबाशान डिसा यांच्याकडे संपर्क साधला व त्यांनी संपूर्ण जबाबदारी उचलताना या महिलेचा मृत्यू झाल्याचे प्रमाणपत्र मिळविले आणि त्यानंतरच अंत्यविधीचे सोपस्कार पूर्ण करण्यात आले.
असा प्रसंग कुणावरही येऊ नये…
बेताळभाटी येथील महिलेवर जो प्रसंग आला तसा प्रसंग अन्य कुणावरच येऊ नये अशी प्रतिक्रिया सरपंच फर्नांडिस यांनी व्यक्त केली आहे. एखादी व्यक्ती हॉस्पिटलाच्या दारात पोचते व तिला सहा तास कुणीच बघत नाही हा अत्यंत दुर्दैवी प्रकार असून इतरांसोबत असे होऊ नये. सर्व हॉस्पिटलावर सद्या ताण आहे याची जाणीव आपल्याला आहे. परंतु, त्यातूनही मार्ग शोधला पाहिजे असे मत सरपंचांनी व्यक्त केले. या महिलेला जर वेळीच ऑक्सिजन मिळाला असता तर कदाचित तिचे प्राण वाचले असते असे सरपंच म्हणाले.