वृत्तसंस्था/ पोर्ट-ऑ-प्रिन्स
हैतीचे अध्यक्ष जोवेनल मोइसी यांची हत्या करण्यात आली आहे. धक्कादायक म्हणजे त्यांच्या घरातच त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. हैतीचे अंतरिम पंतप्रधान क्लॉड जोसेफ यांनी ही घटना बुधवारी पहाटेची असल्याची माहिती दिली आहे. अलिकडच्या महिन्यांमध्ये राजधानीत टोळय़ांमधील हिंसा वाढल्याने देशात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
काही अज्ञात लोक, ज्यातील काही जण स्पॅनिशमध्ये बोलत होते, त्यांनी अध्यक्षांच्या खासगी निवासस्थानावर हल्ला केला आणि देशाच्या अध्यक्षांवर जीवघेणे वार केले. अध्यक्षांच्या पत्नीलाही गोळी लागली असली तरी त्यांचा जीव वाचविण्यास यश आल्याचे पंतप्रधानांनी सांगितले आहे.
काही दिवसांपूर्वी राजधानीत एका मुख्य रस्त्यावर झालेल्या गोळीबारात किमान 15 जणांचा मृत्यू झाला होता. मृतांमध्ये एक पत्रकार तसेच राजकीय कार्यकर्त्याचा समावेश होता. असंतुष्ट पोलीस अधिकाऱयांच्या एका समुहाच्या प्रवक्त्याची त्याच भागात हत्या करण्यात आल्यावर हा गोळीबार झाल्याची माहिती राष्ट्रीय पोलीस प्रमुख लियोन चार्ल्स यांनी दिली होती. या समुहाला ‘फँटम 509’ या नावाने ओळखले जाते. चार्ल्स यांनी या सामूहिक हत्येसाठी फँटम 509 ला जबाबदार ठरविले आहे.