हॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री बेट्टी व्हाइटचे वयाच्या 99 व्या वर्षी निधन झाले आहे. बेट्टी यांनी शुक्रवारी अखेरचा श्वास घेतला आहे. द गोल्डन गर्ल्स आणि द मेरी टायलर मूर शो यासारख्या शोंमध्ये काम केलेल्या बेट्टी व्हाइट यांनी अमेरिकेच्या जनतेला 7 दशकांपर्यंत हसविले आहे.
बेट्टी यांनी हॉलिवूडमध्ये सर्वात प्रदीर्घ कारकीर्दीचा आनंद घेतला आहे. याचबरोबर त्यांचे नाव शोबिजच्या इतिहासातही नोंद झले आहे. बेट्टी यांनी 1949 मध्ये स्वतःच्या टेलिव्हिजन कारकीर्दीची सुरुवात केली होती. त्यांचा अखेरचा चित्रपट ‘टॉय स्टोरी 4’ हा होता. बेट्टी यांनी 2019 मध्ये प्रदर्शित या ऍनिमेटेड चित्रपटातील एका व्यक्तिरेखेला स्वतःचा आवाज दिला होता.
बेट्टी यांच्या निधनामुळे हॉलिवूडला मोठा झटका बसला आहे. दिग्गज कलाकार आणि अध्यक्ष जो बायडे यांनीही बेट्टी यांना सोशल मीडियाद्वारे श्रद्धांजली वाहिली आहे. बेट्टी यांचा जन्म 17 जानेवारी 1922 रोजी झाला होता. ग्रेट डिप्रेशनच्या काळात त्यांचे कुटुंब कॅलिफोर्नियात स्थलांतरित झाले होते. 1949 मध्ये त्यांचा पहिला टेलिव्हिजन शो प्रसारित झाला होता. त्यांनी स्वतःच्या कारकीर्दीत अनेक एम्मी पुरस्कार जिंकले. बेट्टी यांनी आयुष्यात तीनवेळा विवाह केला होता.