मार्चमध्ये केली कामगिरी : आर्थिक वर्षात निर्यात 58 टक्क्यांनी वाढीव
वृत्तसंस्था/ मुंबई
होंडा मोटारसायकल आणि स्कुटर्स इंडिया यांनी मार्च महिन्यामध्ये 3 लाख 9 हजार 549 दुचाकींची विक्री केली आहे. त्याचबरोबर 11,794 दुचाकींची कंपनीने निर्यात केली आहे. आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये कंपनीने एकूण 37 लाख 99 हजार 680 दुचाकींची विक्री केली आहे. याच्यामध्ये 34 लाख 68 हजार देशांतर्गत बाजारात विक्री झाली असून 3 लाख 30 हजार दुचाकींची आर्थिक वर्षामध्ये निर्यात केली गेली आहे.
आर्थिक वर्षामध्ये निर्यातीत 58 टक्के इतकी वर्षाच्या आधारावर पाहता वाढीव नोंद कंपनीने केली आहे. मागच्या आर्थिक वर्षामध्ये म्हणजेच 2020-2021 मध्ये 2 लाख 9 हजार दुचाकींची निर्यात करण्यात आली होती.
गेल्या 20 वर्षांपासून कंपनीने 5 कोटी भारतीय कुटुंबांना दुचाकीचा आनंद मिळवून दिला आहे. तेवढी ग्राहक संख्या कंपनीने कमावली असून येत्या काळातही नवी नवी उत्पादने सादर करण्याचा प्रयत्न होणार असल्याचे होंडा मोटारसायकल कंपनीचे विक्री व विपणन विभागाचे संचालक यादविंदर सिंग यांनी म्हटले आहे. आर्थिक वर्ष 2021-22 मधील कंपनीची कामगिरी वाखाणण्याजोगी असल्याचे ते म्हणाले. 5 कोटी ग्राहक संख्या यंदा वर्षी जोडणे ही मोठी कामगिरी असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
रॉयल इनफिल्डच्या विक्रीत वाढ
आलीशान दमदार मोटारसायकलच्या क्षेत्रामध्ये कार्यरत असणाऱया रॉयल इनफिल्डने मार्चच्या महिन्यामध्ये 67 हजार 677 दुचाकींची विक्री केली आहे. मागच्या वर्षाच्या समान कालावधीच्या तुलनेमध्ये ही वाढ दोन टक्के इतकी नोंदली गेली आहे. मागच्या वर्षी मार्च महिन्यामध्ये कंपनीने 66 हजार 058 मोटारसायकलींची विक्री केली होती. देशांतर्गत दुचाकींची विक्री 58 हजार 477 इतकी राहिली आहे. मार्च 2021 मध्ये मात्र देशांतर्गत दुचाकी विक्री 60 हजार इतकी वाढीव होती.