नगराध्यक्ष विश्वास सावंत यांचे उद्गार, नगरसेवकांसमवेत पत्रकार परिषद, मंत्री नीलेश काब्राल यांच्यावर केलेल्या आरोपांचा निषेध
प्रतिनिधी /कुडचडे
कुडचडे-काकोडा नगर पालिकेतील एक नगरसेवक बाळकृष्ण होडारकर यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला म्हणून लोकांनी आश्चर्य वाटून घेण्याचे कोणतेच कारण नाही. कारण ते कधी पालिकेबरोबर नव्हते व भारतीय जनता पक्षाबरोबरही नव्हते. त्यामुळेच त्यांच्यासोबत आज एकही भाजपचा कार्यकर्ता नाही हे स्पष्ट झाले आहे. तसेच होडारकर यांनी अन्य कोणत्याही पक्षात प्रवेश केला, तरी भाजपच्या कार्यकर्त्यांना कोणताच फरक पडत नाही हे एक सत्य आहे. मात्र त्यांनी प्रसारमाध्यमांसमोर मंत्री नीलेश काब्राल पालिका कारभारामध्ये नाक खुपसतात, नगरसेवकांना विश्वासात न घेता निर्णय घेतात अशी जी विधाने केली आहेत ती चुकीची आहेत व आपण तसेच येथे उपस्थित सर्व नगरसेवक त्याचा निषेध करतो, असे उद्गार नगराध्यक्ष व कुडचडे भाजप मंडळाचे अध्यक्ष विश्वास सावंत यांनी काढले.
नगरपालिका सभागृहात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत उपनगराध्यक्षा रूचा वस्त, नगरसेवक दामोदर भेंडे, प्रमोद नाईक, जस्मिन ब्रागांझा, योलांदा पेरेरा, रिमा एलिस, कार्मेलिना मोराईस आदींची उपस्थिती होती. होडारकर यांनी जी विधाने केलेली आहेत त्यात कोणतेच तथ्य नाही. कारण स्थानिक आमदार असलेले काब्राल हे आताच नव्हे, तर मागील दहा वर्षे पालिकेला सहकार्य करत आहेत व त्यांचे पालिकेवर पूर्णपणे लक्ष आहे. त्यामुळेच पालिकेचा कारभार सुरळीतपणे चालू आहे, असे सावंत म्हणाले.
याअगोदर होडारकर हे पाच वर्षे नगरसेवक होते व दीड वर्षे आधी नगराध्यक्ष होते. त्यावेळेस त्यांनी या विषयावर भाष्य का केले नाही, असा सवाल त्यांनी केला. जेव्हा होडारकर प्रसारमाध्यमांशी बोलत होते तेव्हा तेथे उपस्थित एका पत्रकाराने जर तुम्ही काँग्रेस पक्षातर्फे निवडून आमदार झालात, तर दुसऱया पक्षात जाणार नाही का, असा प्रश्न केला. यावर आपण जनतेला सांगू पाहतो की, जे पक्षांतर करता येऊ नये यासाठी कायदा करा म्हणून सांगत होते त्याच होडारकर यांनी आमदार व्हायच्या अगोदरच भाजपातून काँग्रेस पक्षात उडी मारली आहे. याकडे सगळय़ात आधी काँग्रेस पक्षाने लक्ष द्यायला आहे, असे सावंत म्हणाले.
काब्राल यांच्यासारखा विकास कुणीच केला नाही
त्याचबरोबर होडारकर यांनी दुसरा आरोप करताना आमदारांनी कुडचडेत फक्त इमारतीच बांधल्या आहेत असे म्हटले आहे. पण ज्या प्रकारे आमदार काब्राल यांनी कुडचडेचा विकास केला आहे तसा विकास कोणत्याच आमदाराने याअगोदर केलेला नाही. तसेच जनतेने तिसऱया वेळेला काब्राल यांना संधी देऊ नये असे विधान होडारकर यांनी केले आहे. कुडचडेतील जनतेला आमदारांनी कुडचडेचा विकास किती केला आहे ते चांगलेच माहीत आहे. त्यामुळे दोन वेळा काब्राल जसे निवडून आले आहे तसेच यावेळीही आणि जास्त मतांनी ते निवडून येतील यात कोणतीच शंका नाही. भाजप कार्यकर्त्यांना त्याचा पूर्ण विश्वास आहे, असे सावंत म्हणाले.
अविश्वास ठरावाबद्दल आमदारांना दोषी ठरविणे चुकीचे
तसेच होडारकर यांनी अविश्वास ठरावाबद्दल आमदारांना दोषी ठरविले आहे. ते चुकीचे असून त्यात आमदारांचा कोणताच हस्तक्षेप नव्हता. सदर अविश्वास ठरावाचा निर्णय नगरसेवकांनी एकत्र येऊन घेतला होता. यात त्यांनाही संधी दिली होती, पण त्यांनी ते मान्य केले नाही. त्याचबरोबर नगराध्यक्षपदाविषयीचा निर्णय भाजपतर्फे घेण्यात आला होता. त्यामुळे आज आपण नगराध्यक्षपदावर विराजमान आहे, असे सावंत यांनी यावेळी स्पष्ट केले.
हुकूमशाहीचा आरोप चुकीचा होडारकर यांनी आमदारांनी हुकूमशाही चालविली असल्याचा आरोप केला असून तो चुकीचा आहे. गेल्या दोन बैठकांना आपण उपस्थित होतो. त्यावेळचा आपला अनुभव असा की, आमदार बसलेले असले, तरी त्यांना विचारल्याशिवाय त्यांनी कोणत्याच विषयावर भाष्य केले नाही. यावरून कळून येते की, ते कोणत्याच प्रकारची हुकूमशाही करत नाहीत, असे मत नगरसेवक भेंडे यांनी व्यक्त केले. नगरसेवक होडारकर हे काँग्रेस पक्षात गेले म्हणून कोणालाच वाईट वाटलेले नाही. पण त्यांनी जी विधाने व जे आरोप आमदारांवर केले आहेत ते बरोबर नाही. ते चुकीचे आहे, असे उद्गार नगरसेवक प्रमोद नाईक यांनी काढले.