देवस्थान रक्षण समितीचे जिल्हाधिकाऱयांना निवेदन
प्रतिनिधी/ बेळगाव
होनगा येथे अनेक मंदिरे आहेत. त्या मंदिरांचे ट्रस्टी, पुजारी आणि जीर्णोद्धार कमिटी गैरप्रकार करत आहेत. त्यांची सखोल चौकशी करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी देवस्थान रक्षण समितीचे गजानन पावले यांनी जिल्हाधिकाऱयांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
होनगा परिसरात ऐतिहासिक मंदिरे आहेत. श्री काळभैरव देवस्थान, भैरदेव, भैरवनाथ, कलमेश्वर मंदिर आदी मंदिरांच्या ट्रस्टींनी आणि पुजाऱयांनी भ्रष्टाचार केल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. माहिती अधिकार हक्काखाली सर्व कागदपत्रे आम्हाला मिळाली असून आम्हाला त्यामध्ये गैरप्रकार झाल्याचे उघडकीस आले आहे. तेव्हा या प्रकरणाची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करा, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
महसूल अधिकारी एस. एम. परगी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी गजानन पावले, ऍड. राम घोरपडे, ऍड. प्रवीण करोशी, गजानन घाटगे यांच्यासह देवस्थान रक्षण समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.