मुंबईहून आली होती गावी : मृत महिलेचे नमुने कोरोना तपासणीसाठी पाठविले :
महिला अन्य आजारामुळे मृत झाल्याची प्राथमिक माहिती
जिल्हय़ात आणखी 11 जणांचे रिपोर्ट आले निगेटिव्ह
33 जणांचे कोरोना तपासणी अहवाल प्रलंबित
आयसोलेशन वॉर्डमध्ये 12, होमक्वारंटाईनमध्ये 13 रुग्णांची वाढ
प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी:
होमक्वारंटाईन करण्यात आलेल्या जिल्हय़ातील एका वयोवृद्ध महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे. त्या महिलेच्या मृत्यूनंतर आरोग्य यंत्रणा सतर्क झाली असून त्या महिलेचा स्वॅबचा नमुना घेऊन कोरोना तपासणीसाठी मिरज येथे पाठविण्यात आला आहे. त्या महिलेला कोरोनाची लक्षणे नव्हती. अन्य आजारामुळे तिचा मृत्यू झाला असावा, अशी शक्यता आरोग्य खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.
दरम्यान आणखी 15 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. तर आणखी 11 जणांचे नमुने कोरोना तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. जिल्हा रुग्णालयाच्या आयसोलेशन वॉर्डमध्ये रुग्णांच्या संख्येत वाढ झाली असून नव्याने 12 रुग्ण दाखल करण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धनंजय चाकुरकर यांनी दिली.
मुंबई येथे उपचारासाठी गेलेली सदर महिला मुंबईहून 11 एप्रिल रोजी गावी दाखल झाल्यानंतर तिची आरोग्य तपासणी करून तिला होमक्वारंटाईन करण्यात आले होते. ती होमक्वारंटाईनमध्ये असताना बुधवारी तिचा मृत्यू झाल्याची माहिती प्राप्त होताच तात्काळ आरोग्य पथक त्या महिलेच्या घरी पोहोचले. त्या महिलेच्या स्वॅबचे नमुने घेऊन तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. तसेच खबरदारीच्या उपाययोजनाही सुरु करण्यात आल्या आहेत, अशी माहिती देण्यात आली.
आतापर्यंत 174 नमुन्यांचा अहवाल निगेटिव्ह जिल्हा रुग्णालयामार्फत कोरोना तपासणीसाठी पाठविण्यात आलेले आणखी 15 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. तर नव्याने आणखी 11 जणांचे नमुने कोरोना तपासणीसाठी पाठविण्यात आले असून एकूण 33 नमुन्यांचा अहवाल प्रलंबित आहे. आजपर्यंत एकूण 208 नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. त्यापैकी 174 नमुन्यांचा अहवाल हा निगेटिव्ह आला आहे. एकमेव रुग्णाचा पॉझिटिव्ह अहवाल आला होता. तोही रुग्ण आता कोरोनामुक्त झाल्यामुळे जिल्हय़ात आज रोजी एकही पॉझिटिव्ह रुग्ण नाही.
आयसोलेशन वॉर्डमध्ये 12 रुग्ण वाढले आयसोलेशन वॉर्डमध्ये 48 रुग्णांवर उपचार सुरु होते. त्यात आणखी 12 रुग्णांची वाढ झाली आहे. सद्यस्थितीत आयसोलेशन वॉर्डमध्ये 60 रुग्ण दाखल आहेत. जिल्हय़ात होमक्वारंटाईन करण्यात आलेल्या व्यक्तींच्या संख्येतही वाढ झाली असून नव्याने 13 रुग्णांना होमक्वारंटाईन करण्यात आले आहे. त्यामुळे सध्या 423 जणांना होमक्वारंटाईन करण्यात आले आहे. संस्थात्मक अलगीकरणामध्ये मात्र 22 रुग्णांची संख्या कमी झाली असून सध्या 60 रुग्ण संस्थात्मक विलगीकरणामध्ये आहेत. आरोग्य यंत्रणेमार्फत बुधवारी एकूण 2238 व्यक्तींची तपासणी करण्यात आली.
डायलेसीस रुग्णांची संख्याही वाढली जिल्हा रुग्णालयामार्फत डायलेसीसची सेवा घेणाऱया रुग्णांची संख्या वाढली असून ती आता 41 इतकी झाली आहे. तर खालासेमिआचे 10 व केमो थेरपीचा एक रुग्ण जिल्हा रुग्णालयामार्फत सेवा घेत आहे. जिल्हय़ातील सहा निवारा केंद्रांमध्ये असलेल्या 242 व्यक्तींची तपासणी करून त्यांचे समुपदेशन करण्यात आले आहे.
घरीच अलगीकरण 0423
संस्थात्मक अलगीकरण 0060
पाठविण्यात आलेले एकूण नमुने 0208
अहवाल प्राप्त झालेले नमुने 0175
आतापर्यंत पॉझिटिव्ह नमुने 0001
निगेटिव्ह आलेले नमुने 0174
अहवाल प्राप्त न झालेले नमुने 0033
विलगीकरण कक्षात दाखल 0060
सद्यस्थितीत पॉझिटिव्ह रुग्ण 0000
शुक्रवारी तपासणी झालेल्या व्यक्ती 2238