वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी टेक्सासमधील एका पोस्ट कार्यालयाला दिवंगत शीख पोलीस अधिकारी संदीप सिंग धालीवाल यांचे नाव देण्याची तरतूद असलेल्या विधेयकावर स्वाक्षरी केली आहे. एक वर्षापूर्वी ह्यूस्टनमध्ये वाहतूक व्यवस्था सांभाळत असलेल्या धालीवाल यांची हत्या करण्यात आली होती.
अमेरिकेत भारतीय वंशाच्या लोकांचे नाव आतापर्यंत दोन पोस्ट कार्यालयांना दिले आहे. यापूर्वी पहिले भारतीय वंशाचे खासदार दलिप सिंग सौंद यांचे नाव पोस्ट कार्यालयाला देण्यात आले होते.
धालीवाल नायक आणि मार्गदर्शक होते, त्यांच्या कार्यामुळे शीख आणि धार्मिक अल्पसंख्याकांच्या पिढय़ांना प्रेरणा मिळणार असल्याचे उद्गार खासदार टेड क्रूज यांनी काढले आहेत. धालीवाल यांची 27 सप्टेंबर 2019 रोजी हत्या करण्यात आली होती. भारतात जन्मलेले धालीवाल पालकांसोबत ह्युस्टनमध्ये स्थलांतरित झाले होते. हॅरिस काउंटीच्या कायदा अंमलबजावणी कार्यालयात तैनात धालीवाल हे स्वतःच्या धार्मिक प्रथांचे पालन करत कर्तव्य बजावण्याची सूट मिळविणारे पहिले शीख ठरले होते.