ऑनलाईन टीम तरुण भारत :
मॉन्सूनपूर्व पावसाने सध्या वातावरणामध्ये गारवा निर्माण केला आहे. पावसाळयामध्ये पाऊस, धुके यामुळे वर्षा पर्यटन सर्व पर्यटकांना खुणावत आहे. मोराच्या सहवासात राहणे सर्वांनाच आवडते आणि जर सर्व गावच मोरांचे असेल तर.. ! मोराची चिंचोली हे गाव तर मोरांचे गाव म्हणून ओळखले जाते. मोराची चिंचोली गावात मोर इतक्या मुक्तपणे फिरतात कि जणू ते आपल्या राहणीमानातून असे जाणवून देतात कि ते इथले मूळ रहिवासी आहेत आणि गावकरी पाहुणे म्हणून इथे राहत आहेत. याच वैशिष्ट्यामुळे हे गाव झपाट्याने कृषी पर्यटनाचे आकर्षण केंद्र बनले आहे.
पावसाची चाहूल लागताच मोर आपला पिसारा फुलवून आनंदाने नाचू लागतात. अतिशय दुर्लभ असणारे हे दृश्य क्वचितच सर्वांना पाहायला मिळते. मोराची चिंचोली ला हे दृश्य मात्र नित्याचेच बनले आहे. मोराची चिंचोली या गावाला नाचणाऱ्या मोरांचे ठिकाण यासाठी म्हणतात कारण येथे आढळणारी मोरांची संख्या हे होय.
जून जुलै महिन्यात हे दृश्य पर्यटक पाहू शकतात. कारण त्या नंतर मोराची पिसे गळायला चालू होतात. नोव्हेंबर,डिसेंबर महिन्यात हुरडा पार्टी तर जून आणि जुलै महिन्यात आंबा महोत्सव साजरा केला जातो. पुण्यापासून फक्त ६० किलोमीटर अंतरावर हे गाव आहे. पक्षी निरीक्षकांसाठी तसेच निसर्गप्रेमींसाठी हे गाव म्हणजे आनंदाची पर्वणीच ठरत आहे. तर मग जाणार ना मोराची चिंचोलीला !