वृत्तसंस्था/ अहमदाबाद
2022 च्या आयपीएल क्रिकेट स्पर्धेतील सहा ठिकाणी झालेल्या सामन्यांसाठी खेळपट्टय़ा आणि मैदान सुसज्ज करणाऱया क्युरेटर्स आणि ग्राऊंडस्टाफसाठी भारतीय क्रिकेट नियंत्रण मंडळाने 1.25 कोटी रूपयांचा बोनस जाहीर केला आहे.
2022 ची आयपीएल क्रिकेट स्पर्धा मोठय़ा प्रमाणात यशस्वी करण्यामध्ये क्युरेटर्स आणि ग्राऊंडस्टाफ यांचे योगदान महत्त्वाचे ठरले आहे. या स्पर्धेचे जेतेपद पहिल्यांदाच सहभागी झालेल्या गुजरात टायटन्सने जिंकले. या स्पर्धेला शौकिनांचा अमाप प्रतिसाद मिळाल्याबद्दल मंडळाचे सचिव जय शहा यांनी समाधान व्यक्त केले आहे. रविवारी या स्पर्धेचा समारोप झाल्यानंतर अहमदाबादच्या मोदी स्टेडियमवर जय शहा यांनी सर्व क्युरेटर्स आणि ग्राऊंडस्टाफचे आभार मानले. सीसीआय, वानखेडे, डी.वाय.पाटील, एमसीए पुणे येथील सामन्यांसाठी खेळपट्टी तयार करणाऱया क्युरेटरला प्रत्येकी 25 लाख रूपये, कोलकाता ईडन गार्डन्स आणि अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमच्या क्युरेटरना प्रत्येकी 12.5 लाख रूपये जाहीर केले आहेत. 2022 च्या आयपीएल क्रिकेट स्पर्धेत एकूण 74 सामने खेळविले गेले असून लीग फेरीतील 70 सामन्यांचे यजमानपद मुंबई आणि पुणे यांनी भूषविले. बीसीसीआयतर्फे क्युरेटर्स आणि ग्राऊंडस्टाफच्या बँक खात्यावर ही रक्कम थेट जमा केली जाईल, असे बीसीसीआयतर्फे सांगण्यात आले.