पंतप्रधान-मुख्यमंत्र्यांसह महनीयांचा समावेश
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
भारतात चीनच्या हेरगिरीविषयी मोठा खुलासा झाला आहे. चीन एलएसी सोबतच डिजिटल प्लॅटफॉर्मवरदेखील भारताविरुद्ध कट रचत आहे. याअंतर्गत पंतप्रधान-राष्ट्रपतींसह विविध राज्यांचे मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री, सैन्याधिकारी, उद्योगपती आणि उच्चपदस्थांवर विशेष नजर ठेवली जात असल्याचे उघड झाले आहे. वृत्तपत्राच्या दाव्यानुसार चीन मोठय़ा घटनात्मक पदावरील राजकारणी आणि महत्वाच्या पदांवरील अधिकाऱयांची हेरगिरी करीत आहे. चिनी कंपनी शेनझान भारतातील सुमारे दहा हजार लोकांवर नजर ठेवत असल्याचा दावा केला जात आहे.
झेनझुआ डेटा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी कंपनी लिमिटेडमार्फत ज्या भारतीयांवर नजर ठेवली जात आहे त्यांच्यामध्ये राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, सरन्यायाधीश, गांधी परिवार, ममता बॅनर्जी, उद्धव ठाकरे, नवीन पटनायक सारखे मोठे नेते, राजनाथ सिंह-पियुष गोयल सारखे केंद्रीय मंत्री, सीडीएस बिपिन रावत यांच्यासह अनेक मोठे सैन्याधिकारीही आहेत. राजकारण्यांव्यतिरिक्त सचिन तेंडुलकरसारखे खेळाडू, गौतम अदानींसारखे उद्योगपती, चित्रपट दिग्दर्शक श्याम बेनेगल, सोनल मानसिंह, राधे माँसारख्या सेलिब्रिटींवर देखील चीनची नजर आहे. तसेच शास्त्रज्ञ अनिल काकोडकरांवरही विशेष नजर असल्याचे समजते.